सासवड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

27 Sep 2016 , 06:26:50 PM

केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करून घेण्यासाठी पाठविण्यात आलेल्या प्रलंबित प्रकल्प आणि विकास कामांच्या यादीत गुंजवणी धरणाचा समावेश नसल्याचा गौप्यस्फोट माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सासवड येथे केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, विजय कोलते, माजी आमदार अशोक टेकवडे आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
पुरंदरचे लोकप्रतिनिधी राज्य सरकारमध्ये राज्यमंत्री असले तरी त्यांच्याकडे काहीच अधिकार नाहीत. सर्व निर्णय कॅबिनेट मंत्रीच घेतात. सरकारमध्ये राज्यमंत्र्यांचं कुणीच ऐकत नाही, असा टोलाही पवार यांनी विजय शिवतारे यांचे नाव न घेता लगावला. पुरंदरमध्ये होणाऱ्या विमानतळामुळे या भागाचा विकास होईल, मात्र दलालांना जमिनी विकू नका, अशी सूचनाही त्यांनी स्थानिकांना केली.
शिवसेना, काँग्रेस, भाजप असे सारे पक्ष मोर्चेबांधणी करीत आगामी निवडणूक लढण्यास पुढे येतील पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या आगोदर एकजुटीने लोकांपर्यंत पोहोचायचे आहे, जनतेला विश्वासात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली विकासकामे जनतेसमोर आणा व राष्ट्रवादीच येथे नंबर वन पक्ष असल्याचे विरोधकांना दाखवून द्या, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. भाजप-सेना हे जातीयवादी आहेत त्यांच्या विरोधातच आपली लढाई आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. 
यावेळी बोलताना, राज्याचे मुख्यमंत्री चिडून, ओरडून बोलतात, याचा अर्थ असा आहे की आता त्यांना काम झेपत नाही, ते कामात समाधानी नाहीत, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

संबंधित लेख