राज्य सरकारने दोन दिवसांत मराठा आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करावी - धनंजय मुंडेंचा राज्य सरकारला अल्टीमेटम

29 Sep 2016 , 05:23:09 PM

संपूर्ण राज्यात लाखोंच्या संख्येने मराठा समाजाचे मूक मोर्चे निघत आहेत. या मोर्चांमध्ये विविध मागण्यांसह मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणीही प्रमुख्याने होत आहे. यावर आपले मत व्यक्त करताना राज्य सरकारने दोन दिवसांच्या आत मराठा आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करावी, असा अल्टीमेटम विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारला दिलाय. मराठा आरक्षणासाठी प्रसंगीकायद्यात बदल करायचा असल्यास विरोधी पक्ष सरकार सोबत असेल हे स्पष्ट करतानाच इतर मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्यावे, अशी मागणी मुंडे यांनी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मराठा मोर्चांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे, मात्र सरकारकडून पहिल्या मोर्चापासून आंदोलकांची दखल घेतली गेली नाही, असा आरोप त्यांनी यावेळी राज्य सरकारवर केला. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रीगटाची स्थापन करणार असल्याची माहिती दिली. त्यावर बोलताना मंत्रीगटाची स्थापना करणे म्हणजे मराठा समाजाची फसवणूक असल्याचे मत मुंडेंनी व्यक्त केले. आघाडीच्या काळात राणे समितीने मराठा आरक्षणावर काम केले आहे. आता पुन्हा मंत्रीगट स्थापन करणे म्हणजे वेळकाढूपणा आहे, अशी प्रतिक्रिया मुंडे यांनी व्यक्त केली. मंत्रीगट स्थापन करून हे सरकार मराठा आरक्षणाच्या मार्गात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, तसेच मराठा मोर्चाच्या निमित्ताने सरकार दोन समाजात तेढ निर्माण करत असल्याची टीका त्यांनी या पत्रकार परिषदेत केली. कोपर्डीच्या प्रकरणानंतर मराठा समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्या घटनेला तीन महिने उलटले आहेत. मुख्यमंत्र्यांनी तिथे जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन तीन महिन्यांच्या आत आरोपींना फासावर चढवण्याचे आश्वसान दिले होते मात्र सरकारतर्फे अद्याप साधी चार्जशीटही दाखल झाली नसल्याची खंत त्यांनी बोलवून दाखवली.

संबंधित लेख