कार्यकर्त्यांनी जिद्द आणि चिकाटीने काम करा –अजित पवार

29 Sep 2016 , 05:24:36 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित ‘लक्ष्य 2017’ या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराअंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पुणे येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. २ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या शिबिरास कार्यकर्त्यांचा उत्तम प्रतिसाद लाभत असल्याबद्दल पवार यांनी समाधान व्यक्त केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला ९० हून अधिक जागा जिंकायच्या आहेत.त्यामुळे कार्यकर्त्यांनी जिद्द आणि चिकाटीने पेटून उठून काम करावे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. काम करताना आपल्या कामात कोणताही भडकपणा नसावा, संयमाने काम करा, नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांशी समन्वय साधा, अशा सूचना त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केल्या.
यावेळी राज्यसरकारच्या निष्क्रियतेवर निशाणा साधत पवार यांनी, समाजातील शेतकऱ्यांपासून सर्वच घटक सरकारच्या कारभाराला वैतागले आहेत, राज्यातील कुठलाही घटक समाधानी नसून सरकारला उत्पादक आणि ग्राहक यांच्यात समन्वय साधता येत नसल्याची टीका केली. सरकारचे मंत्री असंवेदनशीलपणे वागत असून सरकारच्या या चुका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या निदर्शनास आणाव्यात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेली विकासकामे अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन पवार यांनी यावेळी कार्यकत्यांना केले.
यावेळी शिबीरास महापौर प्रशांत जगताप, भगवानराव साळुंखे, रवींद्र माळवदकर, आमदार अनिल भोसले, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, नगरसेवक रेश्मा भोसले, नगरसेविका उषा जगताप , माजी महापौर सुरेश शेवाळे, म.वि. अकोलकर, शैलेश बडदे, इकबाल शेख, राकेश कामठे, मनाली भिलारे, बाळासाहेब आहिरे, रजनी पाचंगे आणि नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

संबंधित लेख