मराठा आरक्षणाचा निर्णय सरकारने त्वरीत घ्यावा – अजित पवार

30 Sep 2016 , 04:50:47 PM

मराठा समाजाच्या भावना समजून घेऊन कोपर्डी प्रकरणातील आरोपींना तात्काळ शिक्षा आणि मराठा आरक्षणाचा निर्णय सरकारने त्वरीत घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरत असून लाखोंच्या संख्येने निघणारऱ्या मोर्चांमागची भावना सरकारने समजून घ्यावी, असे पवार म्हणाले. आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मुख्य प्रवक्ते नवाब मलिक आणि प्रदेश प्रवक्ते हेमराज शाह उपस्थित होते.
यावेळी सामनामधील व्यंगचित्राबाबत शिवसेनेच्या आडमुठ्या भूमिकेवरही पवार यांनी टीका केली. मराठा समाज शांततामय मार्गाने मोर्चे काढत असताना शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेले व्यंगचित्र अस्वस्थ करणारे आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवसेना एकीकडे एकदिवसीय अधिवेशनाची मागणी करते तर दुसऱ्या बाजूला व्यंगचित्रातून मोर्चांची टिंगल करत असल्याची टीका त्यांनी केली. वास्तविक मराठा समाज दुखावला गेल्यामुळे व्यंगचित्राबाबत सामनाच्या संपादकांनी माफी मागायला हवी होती. मात्र माफी न मागता, यावर व्यंगचित्रकाराची दिलगिरी घेऊन त्याचाच बळी दिला जात आहे. 

संबंधित लेख