मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा – धनंजय मुंडे यांची मागणी

07 Oct 2016 , 06:20:29 PM

मराठवाडा दुष्काळाने होरपळत असताना मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठकी झाली नाही असे म्हणत मंत्रिमंडळाच्या बैठकीला आता फार उशीर झाला असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. आज औरंगाबादमध्ये मराठवाड्याच्या प्रश्नांबाबत होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. सध्या मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधर पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे, अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे याची दखल घेत सरकारने मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी मुंडे यांनी राज्य शासनाकडे केली. लाखो हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असल्याने सरकारने हेक्टरी मदत जाहीर करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, सरकारने उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील मराठवाड्याच्या हक्काचे पाणी जायकवाडी धरणात सोडून जायकवाडी धरणातून गोदावरी नदीतील बॅरेजमध्ये वर्षातून दोन वेळेला पाणी सोडण्याबाबत ठोस धोरण तयार करावे तसेच त्याच्या अंमलबजावणीचा निर्णय घ्यावा. मध्य गोदावरी खोऱ्यातील मराठवाड्याच्या हक्काचे १८.३३ टी.एम.सी पाणी आंध्र प्रदेशामध्ये वाहून जात आहे. पाणी वापराच्या बृहत आराखड्यास तत्कालीन आघाडी सरकारने मंजुरी दिलेली होती. तेव्हा, बृहत आराखड्यातील प्रस्तावित प्रकल्पांची कामे तातडीने सुरू करण्यासाठी सध्याच्या युती सरकारने कार्यवाही करावी असेही ते म्हणाले. मराठवाड्यात निधी अभावी ६९ सिंचन प्रकल्पांचे कामे रखडले आहेत. या ६९ सिंचन प्रकल्पांपैकी ५१ लघु, ८ मध्यम व १३ मोठ्या प्रकल्पांसाठी १६ हजार कोटी रूपयांचा निधी लागणार असून निधी तीन वर्षात उपलब्ध करून द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.
मराठवाड्यासाठी स्वतंत्र व सक्षम जलआयुक्तालय निर्माण करून मराठवाड्यासाठी सर्व समावेशक जल आराखडा तयार करावा, मराठवाड्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने विदर्भाच्या धर्तीवर मराठवाड्याला विशेष पॅकेज जाहीर करावे, वाढती बेरोजगारी लक्षात घेता सरकारने कुशल कामगार निर्माण होण्यासाठी बीड वा उस्मानाबादमध्ये तंत्रविद्यापीठ उभारावे, आर्थिक डबघाईस आलेल्या जिल्हा सहकारी बँकांना विदर्भाच्या धर्तीवर विशेष पॅकेज देऊन आर्थिक मदत करावी. अशा मराठवाड्याच्या हिताच्या विविध मागण्या यावेळी धनंजय मुंडे यांनी केल्या.
दरम्यान, या मागण्यांसाठी मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसह औरंगाबाद येथे सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली व मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले. यावेळी माजी मंत्री आ. राजेश टोपे, आ. सतीश चव्हाण, आ. अमरसिंह पंडित, आ. रामराव वडकुते, आ. भाऊसाहेब चिकटगावकर, आ. विक्रम काळे, आ. विजय भांबळे उपस्थित होते.

संबंधित लेख