कराड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

07 Oct 2016 , 06:32:08 PM

कराड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस नेते अॅड. राजाभाऊ उंडाळकर पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. अॅड. राजाभाऊ उंडाळकर पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वटवृक्षाखाली येण्याचा निर्णय घेतलाय, पक्षामध्ये राजाभाऊ यांचे भविष्य उज्ज्वल असेल, असे प्रतिपादन पवार यांनी यावेळी बोलताना केले. येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहे, तेव्हा निवडणुकांसाठी जोमाने कामाला लागण्याचे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे माईक निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, मा. खासदार लक्ष्मणराव पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाषराव नरळे, राष्ट्रवादीचे सरचिटणीस अविनाश मोहिते आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
 
दसरा मेळाव्यासाठी उद्धव यांचा माफीनामा 
शिवसेनेचा दसरा मेळावा तोंडावर आहे, ‘त्या’ व्यंगचित्रामुळे मराठा समाजाचा अपमान झाल्याने मराठा समाज मेळाव्याला येणार नाही, हे डोळ्यांसमोर ठेवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाची मुकाट्याने माफी मागितली आहे, असे पवार यावेळी म्हणाले. मराठा समाजाच्या ठिकठिकाणी निघालेल्या मोर्चानंतर आलेली निवेदने व त्यातील मागण्या सरकारकडे असतानाही हे सरकार आरक्षण जाहीर करायला कशाची वाट पाहते आहे? मराठा आरक्षणाबाबत सरकारने तातडीने निर्णय घेतला पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी मांडले.
 

संबंधित लेख