बेजबाबदार वर्तन करणाऱ्या मंत्र्यांना मुख्यमंत्री घरचा रस्ता दाखवणार का? – नवाब मलिक

17 Oct 2016 , 05:17:41 PM

राज्यात मुठभर लोक कायदा व सुव्यवस्था बिघडवत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले वक्तव्य अतार्किक असून खरंतर राज्य सरकारच्या मंत्र्यांकडूनच राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, हेमराज शाह, क्लाईड क्रास्टो व संजय तटकरे उपस्थित होते.
सरकारमधील एक मंत्री खोट्या केसेस दाखल करण्याची धमकी देतात तर दुसरे मंत्री जाहीर सभेत शिव्या देतात. तसेच नाशिकमध्ये बिघडलेल्या परिस्थितीलाही तेथील पालकमंत्री गिरीष महाजनच जबाबदार आहेत. मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवणार काय? असे आव्हान मलिक यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांना दिले.
तसेच दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी वापरलेल्या शिवराळ भाषेचे भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, आमदार राम कदम हे समर्थन करत असल्याबद्दल मलिक यांनी त्यांच्यावर यावेळी कडाडून टीका केली.

संबंधित लेख