जिथे निवडणूक आहे तिथेच आचारसंहिता लागू करावी – अजित पवार

19 Oct 2016 , 06:08:50 PM

नगरपरिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता जिथे निवडणूक आहे तिथेच लागू करावी, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. करमाळा येथे नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आज अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. ग्रामीण तसेच महापालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाल्याने विकास कामे ठप्प होतील, म्हणून जिथे निवडणूक प्रक्रिया सुरू आहे तिथेच अचारसंहिता लागू करावी व अन्यत्र लावलेली अचारसंहिता निवडणूक अयोगाने मागे घ्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी लढवणार असून पक्ष ६० टक्के नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे अजित पवार म्हणाले. निष्कलंक, मेहनती तरूण व समाजात मिसळणाऱ्यांना उमेदवाऱ्या द्या, अशा सूचना त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना यावेळी केल्या. गेल्या दोन वर्षात केंद्र व राज्य सरकारने जनतेचा विकासाबाबत भ्रमनिरास केला आहे. याबाबत जनतेत जाऊन माहिती द्या व याचा फायदा निवडणुकीत पक्षाला कसा होईल याकडे लक्ष देण्याचे आवाहनही पवार यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, जि.प.अध्यक्षा जयमाला गायकवाड, माजी आ.शामलताई बागल, रश्मी बागल, दिग्विजय बागल आदींसह तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख