'नाम' फाऊंडेशनने विधवांचे अश्रू पुसले –सुनील तटकरे

20 Oct 2016 , 04:40:56 PM

रोहा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे रोहा 'नाम' फाऊंडेशनचे संस्थापक आणि प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच तालुकाध्यक्ष मधुकर पाटील, युवा नेता अनिकेत तटकरे, कोकण युवती संघटक अदिती तटकरे, रोहा पंचायत समिती सभापती लक्ष्मण महाले, नगराध्यक्ष समीर शेडगे, उपनगराध्यक्ष प्राजक्ता चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सुभाष राजे आणि पक्षाच्या इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमास हजेरी लावली.
यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नाम फाऊंडेशनच्या कामाचे कौतुक केले. नाम फाऊंडेशच्या माध्यमातून मराठवाड्याच्या दुष्काळी भागात चांगले काम झाले असल्याचे गौरवोद्गार तटकरे यांनी यावेळी काढले. कठीण परिस्थितीच्या काळात नाम फाऊंडेशन विधवांचा आधार बनले. नाना पाटेकरांनी संवेदना काय असतात हे नामच्या माध्यमातून जगाला दाखवून दिले आहे, असे तटकरे म्हणाले.
नाम फाऊंडेशनमुळे मला समाधान मिळाले आहे. त्यामुळे माझ्या सातबारावर माणसे आहेत, त्यांची किंमत मोजता येणार नाही, असे मनोगत नाना पाटेकर यांनी यावेळी व्यक्त केले.

संबंधित लेख