मालाड येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे 'परिवर्तन मेळावा' संपन्न

20 Oct 2016 , 04:42:48 PM

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे 'परिवर्तन मेळाव्याचे' आयोजन आज मालाड येथे करण्यात आले होते. या मेळाव्यात प्रचाराचा नारळ फोडत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी मुंबई मनपातील सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराचा पाढाच मुंबईकरांसमोर वाचला. यावेळी महापालिका तसेच राज्यसरकारमध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपला लक्ष्य करत युतीच्या बेजबाबदार कारभारावर पवार यांनी कडाडून टीका केली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, राष्ट्रीय सचिव खासदार माजिद मेनन, मुंबई अध्यक्ष सचिन अहिरे, आ. किरण पावसकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, ईशान्य मुंबई अध्यक्ष संजय दिना पाटील, मुंबई राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सुरेखाताई पेडणेकर, मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले, युवती मुंबई अध्यक्षा अदिती नलावडे, सोहेल खलील सुभेदार, दिपक पवार, नितीन देशमुख, अमोल मातेले, अमित तिवारी, सुनिल शिंदे, मनिष दुबे, अजित रावराणे तसेच मुंबईतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत संपूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे स्पष्ट केले. एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबई मनपात सत्ता द्या. विकास काय असतो ते आम्ही दाखवतो. मुंबईच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच प्रयत्नशील राहील, याची ग्वाही त्यांनी यावेळी जनतेला दिली. मुंबई महापालिकेत भ्रष्ट्राचार वाढत चाललेला आहे, याउलट राष्ट्रवादीच्या ताब्यातील सर्व महापालिका आम्ही व्यवस्थित चालवत आहोत. भ्रष्टाचाराचा एकही आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर कुणी करू शकत नाही, असे पवार म्हणाले. मुंबईतील डम्पिंग ग्राउंड, नालेसफाई, खड्डे अशा प्रश्नांवर महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर त्यांनी टीकेची तोफ डागली.
तसेच राज्यसरकारवर निशाणा साधत वाचाळवीरांची पलटण घेऊन भाजप राज्य चालवत असल्याचा घणाघात पवार यांनीं केला. तसेच सेनेवर शरसंधान साधत शिवसेना म्हणते हे निजामाच्या बापाचं सरकार आहे, मग कशाला मांडीला मांडी लावून सत्तेत बसता? असा सवाल पवार यांनी केला.

संबंधित लेख