सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे यंदाही शेतकऱ्यांची काळी दिवाळी –अजित पवार

21 Oct 2016 , 04:20:55 PM

भाजप-शिवसेनेतील एकाही नेत्याला शेतकऱ्यांची जाण नसून सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे यंदाही शेतकऱ्यांची दिवाळी काळी असेल, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. अक्कलकोट येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेळाव्यात ते बोलत होते. राज्यातील व केंद्रातील भाजप सरकार जनतेच्या प्रश्नांवर पळ काढणारे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जनता व शेतकऱ्यांबाबत संवेदना नाहीत, त्यांना जनतेच्या प्रश्नांबाबत काहीही देणेघेणे नाही. मराठवाड्याला दिलेले पॅकेजही फसवे आहे, त्याचप्रमाणे मेक इन इंडियाची घोषणाही फसवीच आहे, अशा शब्दांत अजित पवारांनी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. भाजपमध्ये दरबारी राजकारण चालते, अशी टीकाही पवारांनी यावेळी केली. तसेच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झालेल्या व्यंगचित्रावरुन शिवसेनेला टार्गेट करत, ‘शिवसेनेने मराठा मोर्चांची कुचेष्टा केली असून त्याबद्दल जनता शिवसेनेला माफ करणार नाही, शिवसेनेचे हे राजकारण दुर्दैवी असल्याचे वक्तव्य पवार यांनी केले.
या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिपक (आबा) साळुंखे,आमदार दिलीप सोपल, निरीक्षक प्रदीप गारटकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष राजीव क्षीरसागर, सरचिटणीस माणिक बिराजदार ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा यशोदा ढवळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवादलचे जिल्हाध्यक्ष शिवाजी राजेगावकर, प्रांतीक सदस्य दिलीप सिद्धे आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख