गुंडांच्या आधारे निवडणुका लढवाल तर जनताच तुम्हाला तडीपार करेल – नवाब मलिक

21 Oct 2016 , 04:24:12 PM

मुंबई आणि महाराष्ट्र माफीयामुक्त करण्याचा भाजपचा दावा साफ खोटा असून भाजपच गुंडांना आश्रय देत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी हेमराज शाह, क्लाईड क्रास्टो, संजय तटकरे उपस्थित होते.
भाजपने राज्यातील सर्व गुंड आपल्या पक्षात सामावून घेण्याचा कार्यक्रम चालवला असल्याची टीका मलिक यांनी केली. १४ वर्ष तुरुंगात असलेल्या शिवा पाटीलला भाजपने माथाडी कामगारांचा नेता केला आहे. मुंबईमध्ये छोटा राजनच्या पत्नीचा भाऊ शेवाळे याला भाजपमध्ये प्रवेश देण्यात आलाय. जळगावचे जुने मनसेचे नेते ललित कोल्हे तडीपारीचे गुन्हेगार आहेत, त्यांनाही भाजपने त्याला पक्षात स्थान दिले आहे. नाशिकमध्ये पवन पवार आणि नागपूरमध्ये मुन्ना यादव सारखे गुन्हेगार भाजपात आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यामुळे अशा गुंडांच्या आधारे येत्या निवडणुका भाजप लढवणार असेल तर राज्याची जनता भाजपला तडीपार केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मलिक यांनी यावेळी दिला. उत्तर प्रदेश, बिहार येथे गुंडांच्या माध्यमातून सरकार चालते. तीच पद्धत महाराष्ट्रातही राबवण्याचा प्रयत्न भाजपतर्फे सुरू असल्याचा घणाघात त्यांनी केला.

कुख्यात गुंड रियाज भाटी भाजपच्या कार्यकारणीत कसा?
भाजपतर्फे वारंवार दाऊदला देशात आणण्याच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र दाऊदचा हस्तक असलेला रियाज भाटी नामक गुंड पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोटोमध्ये दिसून आला असल्याची माहिती नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. रियाज भाटीवर छळवणूक, जमीन बळकावणे, हप्ता वसूली करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच खंडाळा येथील गोळीबार प्रकरणातही त्याचा हात असल्याचे आढळले आहे. २९ ऑक्टोबर २०१५ रोजी आयबीने रेडकॉर्नर नोटीस दिल्यानंतर भाटीला अटक झाली होती. दाऊदच्या पार्टीला फुलजी भाटी या नावाच्या पासपोर्टवर रियाज जाणार असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता, असेही मलिक यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधानांना भेटण्याआधी भेटणारी व्यक्ती कोण आहे याची माहिती आयबीद्वारे काढली जाते. मग रियाज भाटी याची माहिती काढली नव्हती का? असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्यासारखे अधिकारी असूनही पंतप्रधानांना भेटताना रियाजची माहिती का काढली गेली नाही, याबाबत मलिक यांनी आश्चर्य व्यक्त केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, भाटीच्या नावावर दोन पासपोर्ट आहेत. मग दोन पासपोर्ट बाळगल्याच्या गुन्ह्यात १५ दिवसांतच भाटीला जामीन कसा मिळतो? दोन डझन गंभीर गुन्हे असूनही भाटीवर मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा का दाखल झाला नाही? भाजपमधून त्याची हकालपट्टी का झाली नाही? असे प्रश्न मलिक यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केले. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार  यांच्यावर निशाणा साधत शेलार यांना एमसीए निवडणुकीत मते मिळवून देण्यासाठी विल्सन कॉलेजच्या मुख्याध्यापकांना धमकावण्याचे काम भाटीने केले होते, असा आरोप मलिक यांनी यावेळी केला. इतके गंभीर गुन्हे असूनही रियाज भाटी भाजपच्या मुंबई कार्यकारणीमध्ये कसा आहे तसेच त्याच्याबरोबरच्या भेटीबद्दलचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा, अशी मागणी मलिक यांनी केली.

संबंधित लेख