उदासिन सरकारवर 'राष्ट्रवादी'चे टीकास्त्र

21 Oct 2016 , 07:48:49 PM

मराठा आरक्षणाबाबत उदासिन असणाऱ्या युती सरकारचा बुरखा फाडणारे लक्षवेधी मासिक ‘राष्ट्रवादी’ हे प्रसिद्ध झाले आहे. आपल्या मुखपत्रातील व्यंगचित्राच्या माध्यमातून मराठा मोर्चाची खिल्ली उडवणाऱ्या शिवसेनेवर यंदा राष्ट्रवादीच्या मासिकातून घणाघाती टीका करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या भूमिकेचा वेध या मासिकातून घेण्यात आला आहे. सरकारने मोर्चांची दखल घ्यावी, तसेच मराठा आरक्षण देण्याची भूमिका घेऊन सरकारने आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. मात्र याचवेळी इतर समाजाच्या हक्कांवर गदा येणार नाही याची दक्षता घ्यावी अशी खा. शरद पवार यांनी भूमिका व्यक्त केली आहे.
 
मासिकाच्या माध्यमातून यावेळी मराठा समाजाच्या अपमानाची किंमत निवडणुकीत शिवसेनेला मोजावी लागेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी दिला आहे. लाखोंचा मराठा जनसमुदाय शांततामय तसेच अहिंसावादी मार्गाने आपल्या मागण्या मांडत असताना यावेळी शिवसेनेने आपल्या मुखपत्राच्या माध्यमातून अशा समाजावर अश्लाघ्य चित्रांतून टीका केली. याची किंमत सेनेला मोजावीच लागेल, असा इशाराच अजित पवार यांनी दिला आहे. 
 
संपादकीयमधून राष्ट्रवादी मासिकाचे संपादक सुधीर भोंगळे यांनी 'मराठा तितुका मेळवावा' मार्फत मराठा आरक्षण, कोपर्डी प्रकरण यावर उदासिन सरकारवर टीकास्त्र डागलेय. तसेच गेल्या दोन-अडीच वर्षात शेतकऱ्यांच्या समस्यांकडे राज्य सरकारने साफ दुर्लक्ष केले आहे. युती सरकारच्या काळात शेतकरी पूर्णत: उद्धवस्त झाला आहे, बेरोजगारी वाढली आहे. असा सरकारच्या निष्क्रीयतेचा पाढाच संपादकीयमधून वाचण्यात आलाय.
 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असून यंदा राष्ट्रवादीतर्फे अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच आपले प्रश्न खंबीरपणे सोडवू शकतो व खंबीर नेतृत्व देऊन विकासाच्या वाटेवर नेऊ शकतो हा विश्वास जनतेमध्ये निर्माण करण्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यशस्वी झाले आहेत, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे. सरकारला जनतेचा विसर पडला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये मतदारांनी सरकारला धडा शिकवावा असे आवाहनही सुनील तटकरे यांनी केले आहे. तसेच यंदा पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकेत शतक ठोकणार असल्याचा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला आहे.
 
सध्या अत्यंत संवेदनशील असणाऱ्या सर्जिकल कारवाईचा मागोवाही या मासिकाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. उरी येथील हल्ला, त्याला लष्कराने दिलेले प्रत्युत्तर आणि त्यामागचे राजकारण या लेखात मांडण्यात आले आहे. नेमकी ही कारवाई कशी केली गेली याचाही धांडोळा या माध्यमातून घेण्यात आला आहे. धगधगणाऱ्या काश्मिरचा प्रश्न हाताळण्यात अपयशी ठरलेल्या सरकारवर 'अशांत काश्मिर,अस्थिर काश्मिर' या लेखामधून टीकाटिप्पणी  करण्यात आली आहे. सूरतमध्ये अमित शहा यांना जनरल डायर गो बॅक या घोषणांचा सामना का करावा लागला? याचा मागोवाही या मासिकातून घेण्यात आला आहे. यासोबतच न्यायाधिशांचे प्रश्न, रिक्त जागा तसेच बिर्याणी गोमांस प्रकरण,मानवी हक्कांची पायमल्ली करणारे सरोगसी विधेयक,राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील बंडाळी,एकाधिकारशाहीकडे वाटचाल करणारे मोदी,रामदेव बाबांचे गौडबंगाल यांचा लेखाजोगा मांडण्यात आला आहे.
 
हे मासिक सविस्तर वाचण्यासाठी तसेच सर्व विषयांवरील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटवर वर क्लिक करा. 
 http://ncp.org.in/adminpanel/magazine/1476975500.pdf

संबंधित लेख