रियाज भाटीवर मकोका अंतर्गत कारवाई करा, अन्यथा न्यायालयात याचिका दाखल करू – नवाब मलिक

22 Oct 2016 , 01:25:53 AM

बनावट पासपोर्ट तसेच अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या गुंड रियाज भाटीवर अद्याप मकोका अंतर्गत कारवाई का करण्यात आली नाही ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी उपस्थित केलाय. सरकारने रियाज भाटीवर मकोका अंतर्गत कारवाई न केल्यास न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते हेमराज शाह, संजय तटकरे आणि क्लाईड क्रास्टो उपस्थित होते.
गुंड रियाज भाटी हा बनावट पासपोर्टद्वारे ‘फुलजी भाटी’ या नावाने जोहान्सबर्गला दाऊदच्या पार्टीला जात असताना त्याला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयबीच्या रेडअलर्ट नोटीसनंतर अटक करण्यात आली होती. सहार पोलीस स्टेशनमध्ये फुलजी भाटी हाच रियाज भाटी असल्याचे उघड झाले होते. त्यावेळी त्याच्याकडे दोन पासपोर्ट असल्याचे आढळून आले होते. बनावट पासपोर्ट व इतर गंभीर गुन्हे त्याच्या नावावर असताना त्याला १५ दिवसांत जामीन कसा मिळतो ? ३६५ दिवस झाल्यानंतर देखील त्याच्यावर अजून चार्जशीट का दाखल झाली नाही ? गुंड टोळ्यांशी संबंध असताना त्याच्यावर ‘मकोका’ का लावला नाही? असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना आपण एमसीएच्या मार्केटिंग कमिटीचा अध्यक्ष असल्याचे रियाज भाटीने सांगितले मात्र मलिक यांनी त्याचा हा दावा खोडून काढला आहे. २०१४मध्ये दोन पासपोर्ट प्रकरणी अटक झाल्यामुळे एमसीए निवडणुकीत मतदान करण्याचा भाटीचा अधिकार काढून घेतला होता तसेच एमसीएतून त्याला काढून टाकण्याचाही निर्णय होणार होता. मात्र एमसीएचे उपाध्यक्ष व मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या आग्रहामुळेच त्याला एमसीएत ठेवण्यात आले अशी खळबळजनक माहिती मलिक यांनी दिली.
तर भविष्यात मॅच फिक्सींगची शक्यता नाकारता येत नाही.
दाऊद इब्राहिमचा हस्तक असलेला रियाज भाटी हा स्वतः क्रीडा क्षेत्रात कार्यरत असल्याचे सांगत आहे. परंतु जर रियाज भाटी सारखी माणसे क्रिडा क्षेत्रामध्ये शिरली तर भविष्यात दाऊदच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील मॅच फिक्सिंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज आशिष शेलार हे रियाज भाटीला आश्रय देऊन एक प्रकारे या मॅचफिक्सिंगसाठी हातभार लावत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला.
दाऊद टोळीच्या मदतीने मुंबईत भाजपाचे आमदार निवडून आले 
मागील निवडणुकीत बांद्रा विधानसभा मतदारसंघात शेलार यांच्या विजयासाठी संपूर्ण दाऊद टोळी काम करत होती. या टोळीच्या मदतीमुळे वर्सोव्यात भाजपची कोणतीही ताकद नसताना देखील तिथून भाजपचा उमेदवार निवडून आला. अंधेरी सहीत मुंबईतील इतर जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले त्यासाठी दाऊद टोळीने भाजपला मदत केल्याचा गंभीर आरोप यावेळी नवाब मलिक यांनी केला.
आशिष शेलार व रियाज भाटी यांचे आव्हान स्वीकारतो 
आशिष शेलार व रियाज भाटी यांनी माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे सांगितले आहे. मी त्यांचे हे आव्हान स्वीकारतो. मी जे काही बोलतो त्यात तथ्य असते त्यामुळे मी कोणत्याही नोटीसांना घाबरणार नाही. यापुर्वीही गिरीष बापट यांनी माझ्यावर दावा दाखल केलेला आहे. पंकजा पालवे, चारुदत्त पालवे यांच्या नोटीसा मला आलेल्या आहेत. मी कोणत्याही नोटीसांना व धमक्यांना घाबरणार नाही. त्यामुळे आशिष शेलार, रियाज भाटी व माधव भंडारी यांचे आव्हान मी स्वीकारतो असे मलिक म्हणाले. मलिक यांचे डोके ठिकाणावर नाही असे वक्तव्य आशिष शेलार यांनी केले होते, त्यावर प्रत्युत्तर देताना माझं डोकं हे शांत आहे परंतु माझ्या आरोपांमुळे आशिष शेलार यांच्या हृदयाचे ठोके मात्र वाढलेले आहेत, असा टोला मलिक यांनी लगावला

संबंधित लेख