भाजपने धर्माच्या नावावर राजकीय पोळी भाजू नये – अजित पवार

22 Oct 2016 , 01:28:10 AM

भाजप सरकार धर्माच्या नावावर समाजात द्वेष निर्माण करत असून भाजपने धर्माच्या नावावर राजकीय पोळी भाजू नये, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा ‘संकल्प’ मेळावा घेण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. आमदार दिलीप सोपल या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी बोलताना पवार यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली. विकासाच्या मुद्द्यावर महाराष्ट्राची घसरण होत असून आंध्र प्रदेश, गुजरातनंतर राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्याच्या डोक्यावर तीन लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज झाले आहे. महाराष्ट्र घडण्याऐवजी बिघडतोय, अशी टीका करत रोजगाराच्या बाबतीत किती लोकांना शासकीय, खासगी क्षेत्रात नोकऱ्या मिळाल्या, हे या सरकारने एकदा जाहीर करावे, असे आव्हान पवार यांनी सरकारला दिले.
पुढे बोलताना पवार म्हणाले की, या सरकारचे मंत्री शिवराळ भाषा वापरत आहेत, भाजप खुनी, गुंड लोकांना पक्षात स्थान देत आहे. सरकार शेतकरीविरोधी असून त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळेच शेतीमाल कवडीमोल भावात विकला जात आहे, अशी खंतदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. या सरकारच्या पराभवाची सुरूवात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपासून होणार असून यासाठी कार्यकर्त्यांनी उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत सर्व जागा निवडून आणण्यासाठी जिवाचे रान करावे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
या मेळाव्यास प्रदेश सरचिटणीस प्रदीप गारटकर,जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, जि.प.अध्यक्षा जयमाला गायकवाड, बळीराम साठे,गोपाळराव कोरे, शशिकांत बिराजदार, उत्तरचे तालुकाध्यक्ष त्र्यंबक दबडे, दक्षिणचे तालुकाध्यक्ष डॉ. बसवराज बगले, जितेंद्र साठे, अविनाश मार्तंडे, सभापती कल्पना निकंबे, मकरंद निंबाळकर,आप्पाराव कोरे, जि.प.सदस्या ज्योती मार्तंडे, गणेश पाटील,प्रल्हाद काशीद, सुनील भोसले, प्रा.राज साळुंखे, विद्या शिंदे, उज्जगवला पाटील, रमेश बारसकर, सुभाष बिराजदार, संगम्मा सगरे,सायली शेंडगे,अरुण कापसे उपस्थित होते.

संबंधित लेख