मा. शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनानिमित्त 'कृतज्ञता सप्ताहा'चे आयोजन

30 Nov 2015 , 06:35:32 PM

आदरणीय शरद पवार यांची आजवरची राजकीय वाटचाल आदर्शवत अशी राहिली आहे. विद्यार्थीदशेपासूनच पुण्याच्या परिसरात त्यांनी आपल्या नेतृत्वाची चमक दाखवली. गोवामुक्ती संग्राम, शनिवार वाड्यात केलेले पहिले जाहीर भाषण, युवक प्रदेशाध्यक्ष, तरूण आमदार, तरूण राज्यमंत्री-कॅबिनेट मंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून केलेले कामकाज, विरोधी पक्षनेते, युपीए सरकारचे काम ते कृषीमंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. आतापर्यंत १३ निवडणुकांत ते अपराजित राहिलेले आहेत. १२ डिसेंबर २०१५ रोजी पवार साहेब अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. या निमित्त त्यांच्या कारकिर्दीच्या प्रेरणादायक वाटचालीचा इतिहासच नव्या पिढीपर्यंत नेण्याचे काम पक्षातर्फे करण्यात येणार आहे.

१२ डिसेंबर ते १९ डिसेंबर हा आठवडा 'कृतज्ञता सप्ताह' म्हणून साजरा करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने ठरवले आहे. यामध्ये जिल्हा व तालुकानिहाय कार्यक्रम होणार आहेत. यात विशेषतः रक्तदान शिबीर, मुला-मुलींची सायकल स्पर्धा आणि साहित्य, सांस्कृतिक, कला, क्रीडा, विज्ञान, कृषी व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ७५ वर्षांवरील मान्यवरांचा सत्कार समारंभ होणार आहे. या कार्यक्रमांचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, महिला, युवक, युवती, विद्यार्थी, फ्रंटल आणि विविध सेलचे प्रमुख यांच्या सहभागातून होईल.

तसेच या सर्वांच्या माध्यमातून डिसेंबर २०१५ ते जानेवारी २०१६ या दोन महिन्यांत वरील सर्व कार्यक्रमांचे आयोजन चालणार आहे.

तसेच १० डिसेंबर रोजी दिल्लीतील विज्ञान भवनाच्या कार्यक्रमात पवार यांच्या राजकीय, सामाजिक योगदानातून झालेला विकास दर्शविणाऱ्या गौरव ग्रंथांचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस आणि देशातील सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. १२ डिसेंबर रोजी यशवंतराव प्रतिष्ठान येथे सकाळी ९ ते १ यावेळेत स्वतः पवार साहेब उपस्थित राहून जनसामान्यांच्या शुभेच्छाचा स्वीकार करणार आहेत. तसेच संध्याकाळी मुंबईतील नेहरू सेंटर येथील कार्यक्रमात शरद पवार यांच्या ७५व्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या जीवनातील ७५ सुवर्ण क्षणांचा विस्तृत माहिती असलेले पुस्तक प्रकाशित होणार आहे. हे पुस्तक मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि उर्दू अशा पाच भाषांत असेल. दिल्ली आणि मुंबई येथील दोन्ही कार्यक्रम जरी केवळ निमंत्रतासाठीच असले, तरी २० डिसेंबरला पुणे येथे जाहीर कार्यक्रम घेऊन राज्यातील कार्यकर्ते आणि जनतेसोबत हा आनंदोत्सव आम्ही साजरा करणार आहोत.

संबंधित लेख