राज्यात घड्याळाचा गजर वाजत राहावा – अजित पवार

24 Oct 2016 , 04:40:19 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागे मतदारांनी उभे राहायला हवे, घड्याळाचा गजर केवळ बारामतीतच नव्हे तर राज्यात सगळीकडे वाजत राहायला हवा, जुन्या गोष्टी विसरून पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असे भावनिक आवाहन पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी जनतेला केले. ते आज बारामती येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आगामी निवडणुका फक्त विकासाच्या मुद्दावर लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत त्या त्या परिसराचा विकास हाच मुद्दा घेऊन राष्ट्रवादी निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे प्रतिपादन पवार यांनी यावेळी केले.
कार्यकर्त्यांना संबोधित करताना पवार म्हणाले की, कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरुन एकदिलाने या निवडणुकीत पक्ष ज्यांच्याकडे जबाबदारी सोपवेल त्या उमेदवारांचा प्रचार करावा, इच्छुक पण संधी न मिळालेल्या कार्यकर्त्यांना इतरत्र सामावून घेण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिली. निवडणुकीच्या काळात विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप होतील पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपली पातळी सोडायची नाही, कोणावरही वैयक्तिक स्वरुपाची टीका करायची नाही, अशी सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केली. बारामतीची वाट लावण्याचे वक्तव्य करणाऱ्यांना जनताच त्यांची जागा दाखवून देईल, असा टोला त्यांनी राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांना लगावला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करण्याचे ढोंग करणारे राजू शेट्टी व सदाभाऊ खोत आता कुठे गायब झाले? असा प्रश्नही पवार यांनी उपस्थित केला. बारामतीसाठी विरोधकांचे डावपेच नवीन नाहीत, त्यामुळे राष्ट्रवादीच्या मागे जनता निश्चितच उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संबंधित लेख