निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर जनतेसमोर जाणार-अजित पवार

25 Oct 2016 , 04:43:07 PM

आगामी निवडणुकांमध्ये समविचारी पक्षांना एकत्र घेण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार असून येणाऱ्या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर पिंपरी-चिंचवडच्या जनतेसमोर जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी स्पष्ट केले. ते पिंपरी-चिंचवड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी महापौर शकुंतला धराडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार अण्णा बनसोडे, पक्षनेत्या मंगला कदम, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, डब्बू आसवानी, हनुमंत गावडे आदी उपस्थित होते.
जनतेला विकास हवा आहे, एकमेकांच्या आरोप-प्रत्यारोपांशी त्यांना घेणे देणे नाही. देशातील जाहीर करण्यात आलेल्या स्मार्ट सिटीपेक्षा पिंपरी-चिंचवड शहर हे विकासाच्या बाबतीत कितीतरी पटींनी सरस आहे. त्यामुळे इथून पुढेही विकासाला अधिक महत्त्व दिले जाईल. शहरातील कायदा सुव्यवस्थेला आतापर्यंत नेहमीच प्राधान्य दिले आहे, असे पवार म्हणाले. आम्ही कधीही विकासकामांची जाहिरातबाजी केली नाही ही आमची चूक असून यापुढे जनतेपर्यंत विकासकामे पोहोचविण्यावर आम्ही भर देणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. तसेच उमेदवारी देताना कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विधानपरिषद निवडणुकीबाबत बोलताना उमेदवारीचा निर्णय २६ तारखेला घेऊ असे ते म्हणाले. आगामी निवडणुकांत ६० टक्के नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.
आमचे सरकार नसल्याने आम्ही सुरू केलेला मेट्रो प्रकल्प बारगळला. आता नवीन सरकारकडे आम्ही तो प्रकल्प लवकरात लवकर व्हावा म्हणून पाठपुरावा करत आहोत. सत्ता येण्यापूर्वी आमच्या योजनांना विरोध केला आता सत्ता आल्यानंतर त्याच योजना पोलीस बळाचा वापर करून हे सरकार राबवत आहे, असा आरोप पवार यांनी यावेळी केला. तसेच बंद पाईपलाइनची योजना भाजप आणि शिवसेनेने अडवली असा आरोप त्यांनी केला.
५ कोटीत जवानांच्या शौर्याचा लिलाव केला
मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांनी ५ कोटी रुपयांत जवानांच्या शौर्याचा लिलाव केला अशी खंत व्यक्त करत, आजपर्यंत मनसेने कुठलाही मुद्दा शेवटपर्यंत नेला नसल्याची टीका पवार यांनी केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमाच्या निर्मात्यांसोबत तोडपाणी केली की काय, अशी शंका येते, असा टोला पवार यांनी लगावला.

संबंधित लेख