सध्याचे सरकार असंवेदनशील व शेतकरी विरोधी – अजित पवार

27 Oct 2016 , 04:25:30 PM

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत सांगोला जिल्ह्यात कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी केंद्र व राज्य सरकारने 'अच्छे दिन'च्या नावाखाली शेतकरी तसेच सामान्य जनतेची घोर फसवणूक केली असून भाजप सरकारकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळच नसल्याचा आरोप पवार यांनी केला. या असंवेदनशील व शेतकरी विरोधी सरकारला आता जनताच येत्या निवडणुकीत धडा शिकवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आदरणीय शरद पवार साहेब राज्यात मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री असताना त्यांनी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना शेततळ्यांसाठी भरपूर निधी उपलब्ध करुन दिला. मात्र आज शेतकरी अडचणीत असताना सरकार फक्त घोषणाबाजी करत आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच असून शेतमालाला अद्यापही योग्य हमीभाव देण्यास सरकार अपयशी ठरले आहे. दोन वर्षांच्या कालावधीत सरकारमधील २२ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नदेखील गंभीर बनलाय. सांगोल्यातील शेकापचे ज्येष्ठ नेते आ. डॉ. गणपतराव देशमुख यांच्यासारख्या चळवळीतील नेत्याला खंडणीची मागणी करून जीवे ठार मारण्याची धमकीची पत्रे येत आहेत, यासारखे दुर्दैव कोणते असेल? असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला. केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नांकडे भाजप सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून असंवेदनशीलतेने वागत असल्याची खंत पवार यांनी व्यक्त केली.

संबंधित लेख