काँग्रेस, शिवसेना, मनसेच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

27 Oct 2016 , 04:28:00 PM

माण-खटाव येथील रासप नेते शेखर गोरे यांच्यासह काँग्रेस, शिवसेना, मनसे या प्रमुख पक्षातील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी या कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादीमध्ये स्वागत केले. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, गटनेते जयंत पाटील, आ. शशिकांत शिंदे, माजी मंत्री कमलकिशोर कदम, आ.जयदत्त श्रीरसागर, आ.हेमंत टकले, आ.जयंत जाधव, आ.प्रभाकर घार्गे, आ.संदिप बाजोरिया, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित सदस्यांना संबोधित करताना अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसकडे सत्ता नसताना आपण पक्षात आला आहात, त्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे. जुन्या आणि नव्या दोन्ही कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करायला हवं, तेव्हाच या जातीयवादी सरकारचा पराभव होईल. अजित पवार यांनी आपल्या भाषणात एमआयएमलाही लक्ष्य केले. एमआयएम हा भाजप पुरस्कृत पक्ष आहे. एमआयएमचे नेते तरुणांना भडकवण्याची भाषणे करतात असे ते म्हणाले. आघाडी सरकारच्या काळात राज ठाकरे असे प्रकार करत मात्र तत्कालीन गृहमंत्री स्व. आर.आऱ.पाटील यांनी त्यांच्यावर कडक कारवाई केली. मात्र आताचे राज्यातील आणि केंद्रातील सरकार एमआयएमवर कुठलीच कारवाई करत नाही. हे काय गौडबंगाल आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तरुणांनी एमआयएमच्या कोणत्याही वक्तव्याला बळी पडू नये असे आवाहन त्यांनी उपस्थित तरुणांना केले.
हे सरकार सगळ्याच गोष्टीत अपयशी ठरले असल्याची टीकाही पवार यांनी यावेळी केली. सरकारने 'मेक इन इंडिया'च्या नावाखाली जनतेची फसवणूक केली. राज्यात कायदा-सुवस्थेची स्थिती बिकट झाली आहे. पोलिसांना मारहाण होत आहे. या सरकारवर कोणीच खूष नसल्याचे सांगत येणाऱ्या निवडणुकांमध्ये पीएम आणि सीएम दोघांना धडा शिकवा, असे आवाहन पवार यांनी कार्यकर्त्यांना केले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, आजच्या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बळ आणखी वाढले आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्षाला घवघवीत यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच येत्या काळात राज्यातील राजकीय समीकरण बदलेल अशी खात्री असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित लेख