आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज –सुनील तटकरे

27 Oct 2016 , 04:29:38 PM

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज असून समविचारी पक्षांशी आघाडी करण्याचे अधिकार हे स्थानिक पातळीवर सोपविण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे यांनी दिली. मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, प्रदेश प्रवक्ते हेमराज शाह, अतुल लोंढे, क्लाईड क्रास्टो, संजय तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
पक्ष कार्यालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रभारी व पक्षनेत्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकांबाबत जिल्हानिहाय सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत आघाडी करण्याचे अधिकार हे स्थानिक पातळीवर त्या त्या जिल्ह्याचे प्रभारी व नेत्यांवर सोपविण्यात आले आहेत. तसेच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याच्या संबंधातील निर्णयदेखील स्थानिक पातळीवर दिले असल्याची माहिती तटकरे यांनी दिली. दोन-तीन दिवसात पक्षाच्या वतीने १६५ नगरपालिकांसाठी अर्ज दाखल करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
फेब्रुवारी २०१७ मध्ये जिल्हा परिषदा, पंचायत समिती, तसेच राज्यातील १० महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्याही दृष्टीकोनातून संबधित जिल्ह्याचे प्रभारी व नेते कार्यरत आहेत. नगरपालिकांचा दुसरा टप्पा हा डिसेंबर महिन्यात व तिसरा टप्पा त्यापुढील जानेवारी महिन्यात आहे, त्यादृष्टीनेही पक्षाने तयारी केलेली आहे. आमचे नेते पक्षाची भूमिका घेऊन जनतेपर्यंत जाणार आहेत. मागील नगरपंचायतीच्या निवडणुकीत पक्षाने चांगले यश मिळवले होते, तसेच यश याही निवडणुकीत पक्षाला मिळेल असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.

संबंधित लेख