राज्यातील जनता हीच राष्ट्रवादीची खरी ताकद – अजित पवार

28 Oct 2016 , 05:01:04 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार आगामी निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी आठवड्याभरापासून सोलापूर जिल्ह्यात मेळावे घेत असून आज मोहोळ येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आदरणीय शरद पवार साहेबांच्या दूरदृष्टी धोरणांमुळे आज सोलापूर जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक साखर कारखाने आहेत. राष्ट्रवादीमुळे येथील अनेक लोकांचे संसार उभे राहिले असून पक्षाने नेहमीच जनतेच्या हिताची भूमिका घेतली असल्याचे प्रतिपादन अजित पवार यांनी केले. तसेच सध्याच्या युती सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेहमीच जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील कारण राज्यातील जनता हीच राष्ट्रवादीची खरी ताकद आहे, असे पवार म्हणाले.
युतीचे सरकार हे जनतेला खोटे बोलून, फसवून सत्तेत आले आहे. सत्तेत येण्यापूर्वी दिलेले एकही आश्वासन या सरकारने पूर्ण केलेले नाही. धनगर,मराठा, मुस्लिम,लिंगायत समाज आजही आरक्षणापासून वंचित आहे. हे जनतेलाही आता कळले असून जनताच आता या सरकारला जाब विचारेल, असे त्यांनी स्पष्ट केले. मोहोळ तालुका हा राजन पाटलांच्या नेतृत्वाखाली कायमच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. पुढील काळातही आपण कायम मोह़ोळकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला.
यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन राजन पाटील,पक्षाचे निरीक्षक प्रदीप गारटकर, जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अजिंक्यराणा पाटील,अभिजीत ढोबळे,बळीराम साठे,बाबाराजे देशमुख, जयमाला गायकवाड,यशोदा ढवळे, कौशिक गायकवाड,मानाजी माने,शाहजहान शेख,रमेश बारसकर,संकेत ढवळे, अंबिका पाटील,कल्पना निकंबे,अप्पासाहेब कोरे,विक्रांत माने,प्रकाश चवरे,नागेश साठे,सज्जन पाटील आणि पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख