स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी घवघवीत यश मिळवेल - संग्राम कोते पाटील

28 Oct 2016 , 05:02:41 PM

भाजप-शिवसेना युती सरकारने शेतकरी व सर्वसामान्य जनतेचा विश्वासघात केला असल्याने जनतेमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. विविध समाजांचे मोर्चे निघत असून सर्वत्र असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असल्याने आगामी पदवीधर मतदार संघ, नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच झेंडा फडकेल, असा विश्वास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी व्यक्त केला आहे. नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, त्याप्रसंगी कोते पाटील बोलत होते.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी सांगितले की, नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घट्ट पकड असल्याने सर्व नगरपालिकांच्या व जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वशक्तीनिशी सज्ज झाला असून सर्वच्या सर्व नगरपालिकांवर तसेच जिल्हा परिषदांवर राष्ट्रवादी काँग्रेसचीच एकहाती सत्ता येईल. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर आवश्यकता वाटल्यास समविचारी पक्षांशी चर्चा करण्यात येईल असे देखील पगार यांनी यावेळी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास कादवा साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, आमदार दिपिका चव्हाण, आमदार नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. विजयश्री चुंभळे, उपाध्यक्ष प्रकाश वडजे, सभापती उषा बच्छाव, माजी आमदार दिलीप बनकर, माजी आमदार संजय चव्हाण, प्रदेश पदाधिकारी डॉ. भारती पवार, मुक्तार शेख, राजेंद्र भोसले, शोभा मगर, सचिन पिंगळे, राजेंद्र जाधव, डॉ. योगेश गोसावी, प्रेरणा बलकवडे, दीपक वाघ, अकबर शहा, रामदास पाटील, शहाजी भोकनळ आदी उपस्थित होते.

संबंधित लेख