महाराष्ट्र रडतोय, महाराष्ट्र बिघडतोय - नवाब मलिक

03 Nov 2016 , 11:44:19 PM

महाराष्ट्र बदलतोय, महाराष्ट्र घडतोय अशा खोट्या जाहिराती करत राज्य सरकार मिरवताना दिसतयं मात्र या दोन वर्षात राज्याची रया गेली आहे. या सरकारच्या कारकि‍र्दीत महाराष्ट्र रडतोय, महाराष्ट्र बिघडतोय असंच म्हणावं लागणार आहे. आज राष्ट्रवादी कॉंंग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्य सरकारच्या निष्क्रियतेचा आढावा घेण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती, त्यावेळी बोलताना त्यांनी खालील मुद्द्यांवर आपली मतं मांडली.

दोन वर्षात या राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. महिला अत्याचारांची संख्या वाढली आहे. आजची एक दुर्देवी घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव पोलिस स्टेशन हद्दीतून समोर आली. रामचंद्र शिक्षण संस्थेत ब-याच आदिवासी मुलींवर लैंगिक अत्याचार झालाय. दिवाळीच्या सुट्टीत मुली घरी गेल्यानंतर एका मुलीच्या पोटात दुखायला लागल्यामुळे ती गर्भवती असल्याचे समजले. पालकांनी तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी तक्रार घ्यायला नकार दिला. लोकांनी दबाव टाकल्यावर तक्रार नोंदवली गेली. या मुलीच्या पालकांनी तक्रार केल्यानंतर इतर मुलीसुद्धा धीराने समोर आल्या. फडणवीसांच्या राज्यात लहान मुलींवर अत्याचार होत आहेत. महिलांवर असे रोज अत्याचार होत असताना आदिवासी विकास मंत्री, महिला व बालकल्याण मंत्री काय करत आहेत? असा खडा सवाल नवाब मलिक यांनी केला. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्वच आदिवासी आश्रमशाळांची तपासणी करा, तिथल्या लहान मुलांवर काही अत्याचार होत आहेत का याची तपासणी करा ही मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन आदिवासी विकास मंत्री आणि महिला व बालविकास मंत्री यांची हकालपट्टी करावी अशीही मागणी करण्यात आली.

नीती आयोगाने महाराष्ट्राला फार्मर फ्रेंडली स्टेट घोषित केलं यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नवाब मलिक यांनी नीती आयोग सरकारला मॅनेज झालं आहे का? असा प्रतिप्रश्न् केला. कोणत्या निकषावर महाराष्ट्राला फार्मर फ्रेंडली स्टेट घोषित केले? राज्यात सर्वात जास्त आत्महत्या झाल्या म्हणून फार्मर फ्रेंडली आहे का? कांदा, कापूस, झेंडू फुले यांना भाव मिळत नाही म्हणून फार्मर फ्रेंडली आहे का? असे प्रश्न करत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. महाराष्ट्रातले सरकार असो किंवा केंद्रातले सरकार असो सर्वच पोकळ घोषणा देऊन लोकांची फसवणूक करत आहेत.

कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधत त्यांनी कामगारांचीही परिस्थिती वाईट आहे असं वक्तव्य केलं. कामगार कायदा बदलण्याचा सरकारचा घाट आहे. कामगारांना कायद्याच्या फायद्यापासून वंचित ठेवण्याचा कट सरकार रचत असल्याची टीका त्यांनी केली. १४ वर्ष शिक्षा झालेले शिवा पाटील माथाडी कामगार नेते झाले आहेत. डाव्या चळवळीतल्या युनियनच्या नेत्यांना छोटा राजन टोळीच्या माध्यमातून धमकी दिली जात आहे. स्वतःच्या युनियनमध्ये सभासदत्व करायला भाग पाडले जात आहे, असे म्हणत त्यांनी कामगार क्षेत्रात गुंड लोकांना घुसवण्याचे प्रकार भाजप करत असल्याची टीका केली.

मेक इन इंडियाच्या नावाखाली लोकांची फसवणूक होत आहे. या माध्यमातून किती रोजगार निर्माण झाले याची आकडेवारी सरकारने द्यावी. वाणिज्य मंत्रालयाने दोन दिवसांपूर्वी अहवाल दिला, त्यानुसार महाराष्ट्र इंड्रस्ट्रीअल फ्रेंडली नाही. महाराष्ट्र दहाव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. तरीही मुख्यमंत्री सातत्याने महाराष्ट्र अव्वल असल्याचे सांगत आहेत.

पूनम महाजन यांच्या माध्यमातून कोल्ड प्ले बँडचे गरिबी हटावच्या नावाखाली आयोजन केले जात आहे त्यावरही त्यांनी टीका केली. हा बँड गरीबी हटवण्यासाठी नाही तर गरीबांचा बँड वाजवण्यासाठी असल्याचे त्यांनी वक्तव्य केले. मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच हा बँडला आणला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. याआधी शिवसेनेनेही मायकल जॅक्सन यांना बोलावून गरिबी हटवण्याचा प्रयत्न केला होता. तोच प्रकार आता भाजप करत आहे. या ब्रिटिश बँडला कर सवलत देण्याचा सरकारने निर्णय मागे घ्यावा असा इशाराही त्यांनी दिला.

एकूणच सर्वच स्तरावर सरकारची धोरणे कुचकामी ठरली आहे. त्यामुळे या युती सरकारच्या कारकि‍र्दीत महाराष्ट्र रडतोय, महाराष्ट्र बिघडतोय असं म्हणाव लागणार आहे.

संबंधित लेख