युती सरकार हे शेतकऱ्यांविरोधी सरकार – अजित पवार

07 Nov 2016 , 06:19:38 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने इंदापूर तालुक्यात शनिवारी शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी शेतकरी मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने प्रत्येकवेळी कार्यकर्त्यांना न्याय दिला आहे. राष्ट्रवादीने अनेक संस्थांची स्थापना केली. आज त्या संस्था सक्षमपणे काम करत आहेत. राष्ट्रवादीने बारामती, पिंपरी-चिंचवड सारख्या भागांचा कायापालट करुन दाखवला. इंदापुरातही आम्हाला कार्य करायचे आहे. दत्ता भारणे यांच्या रुपाने इंदापूरला एक चांगला आमदार मिळाला आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन विकास करणे ही त्यांची वृत्ती आहे. आ.भारणे यांचे काम पाहून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला त्यांचा रास्त अभिमान वाटतो.
हे सरकार शेतकऱ्यांविरोधी आहे, या सरकारने शेतकऱ्यांविरोधी निर्णय घेतले आहेत. राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. शेतकरी आज अडचणीत सापडला आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध नाही. ही परिस्थिती बदलायला हवी,
असे पवार म्हणाले. 
कार्यकर्ते व मतदारांनी गाफिल न राहता कृषी उत्पन्न बाजार समितीसह येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन यावेळी अजित पवार यांनी केले.

संबंधित लेख