राज्यातील सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी – अजित पवार

10 Nov 2016 , 09:07:40 PM

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार अनिल भोसले यांच्या प्रचारार्थ बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पुणे ग्रामीणचा दौरा केला. राजगुरूनगर येथील बाजार समितीच्या सभागृहात काही नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य तसेच प्रमुख कार्यकर्त्यांची भेट यावेळी त्यांनी घेतली.

यावेळी बोलताना पवार म्हणाले की, केंद्र व राज्यातील सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले असून जनता सरकारच्या कारभाराला कंटाळली आहे. येत्या विधान परिषदेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. असे आवाहन यावेळी अजित पवार यांनी केले.

शिरुरचे विमानतळ गेल्याने या भागाचे खूप नुकसान झाले. उद्योगधंद्याला याचा फटका बसला. स्थानिक जनता रोजगारापासून वंचित राहिली. हे सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे झाले. गेल्या दोन वर्षांमध्ये शिवसेनेच्या आमदारांनी किती विकासाची कामे आणली? असा सवालही अजित पवार यांनी यावेळी केला.

खेड तालुक्यातील तीनही शहरे बकाल झाली आहेत. स्वच्छ भारतच्या नावाने आरडाओरड करणाऱ्या भाजप सरकारचे डेंग्यू, चिकनगुनिया सारख्या आजारांकडे लक्ष नाही. अनेक ठिकाणी लोक आजाराने त्रस्त आहेत. परिस्थिती फार वाईट आहे. या अशा निष्क्रिय सरकारला पायउतार करणेच गरजेचे आहे, असे पवार म्हणाले.

संबंधित लेख