जिल्हा बँकांवर विश्वास नसेल तर मंत्रालयातले अधिकारी बँकेत बसवा – नवाब मलिक

18 Nov 2016 , 07:39:24 PM

नोटबंदीच्या निर्णयानंतर सरकारतर्फे रोज तुघलकी निर्णय बाहेर येत आहेत. केंद्रीय वित्त सचिव संसदेला टाळून रोज नव्या घोषणा करत आहेत. बोटाला शाई लावणे, पैसे काढण्याची मर्यादा ४५०० वरून पुन्हा २००० वर आणणे अशा प्रकारचे नवनवे निर्णय रोज लोकांसमोर मांडले जात आहेत. लोकशाहीसाठी ही चांगली गोष्ट नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख प्रवक्ते नवाब मलिक यांनी आपले मत मांडले. ते मुंबईतील राष्ट्रवादी भवनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

जिल्हा मध्यवर्ती बँकाना नोटा बदलीसाठी परवानगी दिली असती तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असता. मात्र जिल्हा व सहकारी बँकांवर अविश्वास दाखवून सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ केलेली आहे, अशी त्यांनी टीका केली. केंद्र सरकारने जिल्हा व सहकारी बँकांना या कार्यक्रमात सहभागी करून घेतले पाहिजे, ही मागणी यावेळी मलिक यांनी केली. बँकावर विश्वास नसेल तर मंत्रालय बंद करून तिथले अधिकारी जिल्हा बँकेत बसवा आणि याची अंमलबजावणी करा, असा सल्लाही त्यांनी यावेळी सरकारला दिला.

भाजप सरकारच्या शेतकरीविरोधी भूमिकेवर टीका करताना ते म्हणाले की भाजप सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत अनुकूल नाही, हे आम्ही आधीपासून सांगतच होतो. आता उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज माफ करून सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आणि उद्योगपतींच्या बाजूने असल्याचे स्पष्ट कळते.

येत्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना काँग्रेसची एकत्र लढण्याची तयारी असल्यास राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करण्यास तयार आहे. मात्र, श्रेष्ठींवर निर्णय टाकून आघाडी होत नसेल तर वेगळे लढण्याची आमची तयारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, आगामी १६५ नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी ८२ जागी समविचारी पक्षांसोबत राष्ट्रवादीने आघाडी केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.


मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने हॉट प्ले बँड – नवाब मलिक

कोल्ड प्ले बँडचे गरिबी हटावच्या नावाखाली आयोजन केले जात आहे त्यावरही नवाब मलिक यांनी टीका केली. कोल्ड प्ले च्या विरोधात मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने हॉट प्ले हा बँड विनामूल्य वाजविण्यात येणार आहे. कोल्ड प्ले ला सरकारने विविध करात सुट दिली आहे, या कार्यक्रमाला दारू पिण्याची संमती दिलेली आहे. शिवाय या शोचे तिकिटही महाग आहे. याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे विनामूल्य बँड, दारूविरहीत आणि गरीब लोकांसाठी बीकेसीच्या सहा रस्त्यांवर हॉट प्ले बँड वाजवण्यात येणार आहे, अशी माहिती मलिक यांनी दिली. या कार्यक्रमाचे आयोजन मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. निलेश भोसले आयोजन करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

संबंधित लेख