ढिसाळ नियोजनामुळे सामान्य जनतेला आर्थिक आणीबाणीचा सामना करावा लागत आहे -प्रफुल पटेल

18 Nov 2016 , 08:20:25 PM

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात झाली. राज्यसभेत नोटबंदीवरुन विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून खा. प्रफुल पटेल यांनी पक्षाची भूमिका मांडली.
काळा पैसा बाहेर काढणे, दहशतवादाला खीळ बसणे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नोट बंदीच्या निर्णयाचे स्वागत केले होते. पण, नोटबंदीच्या अंमलबजावणीसाठी सरकारने तयारी केली असेल असं आम्हाला वाटलं होतं. पण सरकारची तशी कोणतीच तयारी दिसत नाही. नवीन २००० रूपयाच्या नोटा त्याच्या आकारामुळे सध्याच्या एटीएम मशीन मधून कशा येणार याचा तरी विचार आधी करायला हवा होता. मुंबईसारख्या शहरात एटीएममध्ये पैसे नाहीत. मग देशभरातील ग्रामीण भागातील लोक कसे व्यवहार करत असतील?, असा सवाल प्रफुल पटेल यांनी भाषणातून सरकारला विचारला. माध्यमात या बातम्या का येत नाही माहिती नाही. पण आपल्याला यावर चिंतन करावे लागणार आहे, असे ते म्हणाले. भारत हा जास्त लोकसंख्या, भूभाग असलेला देश आहे. आपल्याकडील सगळा व्यवहार रोखीचा आहे. नेट बँकीग, कार्ड पेमेंट व्यवहार आपल्याकडे अजूनपर्यंत तेवढा रुळलेला नाही. १९७८ साली जेव्हा अशाप्रकारचा निर्णय घेण्यात आला होता तेल्हा फक्त १ टक्के पैसा मोठ्या नोटांमध्ये होता. त्यामुळे त्यावेळी घेतलेल्या निर्णयाचा मोठा परिणाम झाला नव्हता. आता मोठ्या नोटांमधला पैसा ८७ टक्के आहे. ८७ टक्के चलन रद्द केल्यानंतर सर्वत्र आर्थिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. अखेर उद्देश कितीही चांगला असला तरी सरकार नियोजनाच्या बाबतीत हा निर्णय घेताना पूर्णपणे अयशस्वी झाले आहे असे मत पटेल यांनी मांडले.

संबंधित लेख