मुंबईला यातना देणाऱ्यांना मुंबईकर आता घरी बसवतील - शरद पवार

22 Nov 2016 , 05:26:16 PM

आज सत्तेत बसलेल्या घटकांचे निर्णय देशाला, राज्याला आणि मुंबईकरांना यातना देणारे असल्याचे खासदार शरद पवार यांनी मुंबई येथील परिवर्तन सभेत सांगितले. कशाला महत्व द्यायचे आणि किती द्यायचे याचा विचार राज्यकर्त्यांनी करायचा असतो. आज मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांना किती यातना होतात, हे मी सांगायची गरज नाही. जसा निवाऱ्याचा प्रश्न महत्त्वाचा असतो तसा दळणवळणाचा आणि मुंबईकरांसाठी लोकलचा प्रश्न महत्वाचा आहे. यासाठी दळणवळणाची गाडी सुरळीत धावली पाहिजे. पण मुंबईकरांच्या यातना सरकारला दिसत नाहीत. त्यांना मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन दिसते. ९८ हजार कोटी रूपये खर्च करून त्यांना अहमदाबादला जायची घाई लागली आहे. मुंबई लोकलसाठी आठ हजार कोटी खर्च केले, तर मुंबईकरांचे प्रश्न सुटतील.

९८ हजार कोटी रूपयांत मुंबई-दिल्ली, दिल्ली-कलकत्ता आणि कलकत्ता-चेन्नई या सर्व ठिकाणच्या ट्रेन धावू शकतात. पण त्याकडे पंतप्रधान साहेबांचे लक्ष नसल्याची टीका पवार यांनी यावेळी केली. मुंबईच्या दळणवळणासाठी वेळीच निधी खर्च केला नाही तर मुंबईकरांच्या यातना वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे यातना देणाऱ्यांना बाजूला करण्याचा निर्णय मुंबईकरांना आता घ्यावा लागेल, असे आवाहन पवार यांनी मुंबईकरांना केले.

संबंधित लेख