मेरा देश बदल रहा है... अमीर डर रहा है, गरीब मर रहा है...

23 Nov 2016 , 08:08:30 PM

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज मुंबईत घाटकोपर येथे परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई महानगरपालिकेत शिवसेना-भाजपाची सत्ता असतानाही मुंबईचा विकास झाला नाही. मुंबई मध्ये परिवर्तन घडणे खूप गरजेचे आहे, असे मत याप्रसंगी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा. शरद पवार, खा. प्रफुल पटेल, विधीमंडळ गटनेते आ. जयंत पाटील , आमदार जितेंद्र आव्हाड, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आमदार विद्या चव्हाण, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश भोसले , कार्याध्यक्ष नितीन देशमुख, मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष अमोल मातेले आणि मुंबईतील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना सचिन अहिर म्हणाले की येत्या २६ तारखेपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे संविधान रॅलीचे आयोजन केले जाणार आहे. तेव्हा मुंबईच्या ३६ तालुके, २२७ वार्डांत जाऊन सरकारच्या कारभाराचा पंचनामा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात येणार आहे. करून दाखवलं म्हणणाऱ्या मनपा सत्ताधाऱ्यांच्या युवराजांनी पेंग्वीन मारून दाखवलं. थीम पार्क पासून अनेक आश्वासने त्यांनी दिली. पण, एकही आजपर्यंत पूर्ण केलेले नाही. मुंबईच्या जनतेला आज परिवर्तन हवं आहे. हे परिवर्तन फक्त राष्ट्रवादी काँग्रेस देऊ शकते, असेही आश्वासन यावेळी अहिर यांनी दिले.

विधीमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की मुंबई मनपाने भ्रष्टाचारविरहीत कामकाज केले तर मुंबईचे उत्पन्न दुप्पट होईल. इतका भ्रष्टाचार झालेला आहे की आता भ्रष्टाचाराची पुस्तिका काढण्याचे काम राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी करावे. अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचा आघाडीच्या काळात झाले होते. ती जागा आम्ही शोधली, प्रस्ताव तयार केला. पण, या सरकारला दोन वर्षात पुढे जाता आले नाही. आम्ही जे काम केले त्याच्या काकणभर कामदेखील या सरकारला करता आलेले नाही, अशी बोचरी टीका यावेळी जयंत पाटील यांनी केली.

खा. प्रफुल पटेल म्हणाले की, देश बदलतोय, जग बदलतंय पण मुंबईचं काय? मुंबई आहे तिथेच आहे. आज ८० टक्के मुंबईकर रस्ते, पाणी, स्वच्छतागृहाची लढाई लढतोय. मुंबईत एकेकाळी गिरणी कामगार होते, गोदी होती, हिरा व्यापार होता. आज मुंबई कोणत्या रोजगारासाठी ओळखली जाते? मुंबईत कुठेच नवीन उद्योग नाही. मुंबई हे बेरोजगारांचे शहर झाले आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणणारे आपण. पण, ही आर्थिक राजधानी राहणार का? याचा विचारही केला पाहीजे. अडीच वर्ष झाले कोस्टल रोड सोडा पण त्याचा नकाशा देखील पाहायला मिळाला नाही. आघाडी सरकारच्या प्रयत्नाने विमानतळाशेजारी २३ हजार घरे तयार आहेत. पण त्याचे वाटप अद्यापही करण्यात आलेले नाही अशी शोकांतिका प्रफुल पटेल यांनी मांडली.

आ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की लोकशाहीच्या चौथा स्तंभावर गोळी मारण्याचे काम मोदी करत आहेत. एनडीटीव्ही वर बंदीचा निषेध मोर्चा सर्वात आधी राष्ट्रवादीने ठाण्यात काढला. त्यानंतर एनडीटीव्हीवर आणलेली बंदी उठविण्यात आली. मोहम्मद तुघलकने सहा महिन्यांत दोनदा चलन बदललं. सैन्य भुकेने त्रस्त झाल्यावर तुघलकची सत्ता उलटवून लावली. हा इतिहास आहे. यापुढील काळात इतिहासाची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही.

 

संबंधित लेख