चिपळूण नगरपालिकेच्या हद्दीत झालेल्या विकास कामांवर जनता पुन्हा पक्षाच्या हातात सत्ता देईल – सुनिल तटकरे

24 Nov 2016 , 06:02:45 PM

चिपळूण नगरपालिकेच्या हद्दीत झालेल्या विकास कामांवर जनता पुन्हा पक्षाच्या हातात सत्ता देईल असा विश्वास व्यक्त करून चिपळूण शहराचा कायापालट करू अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिली. यावेळी रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम, चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम, तालुकाध्यक्ष जयेंद्र खताते, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष दादासाहेब साळवी, चिपळूणच्या सभापती स्नेहा मेत्री, विद्यमान नगराध्यक्ष सावित्रीबाई होमकळस, शौकत भाई मुकादम, अजमल पटेल, अशोकराव कदम, सुरू शेठ खेतळे, श्रीकृष्ण खेडेकर,सर्व नगरसेवक पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारार्थ आज चिपळूण येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना तटकरे यांनी सांगितले की मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की माझ्यासारखा ग्रामीण भागातून निवडून आलेला कार्यकर्ता जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवितो आणि पवार साहेबांसारखे नेते त्या कार्यकर्त्याला सत्तेत आल्यावर नगरविकास राज्यमंत्री करतात. राज्यामध्ये २२८ नगरपालिका आहेत. चिपळूण नगरपालिका ब वर्गात मोडते. चिपळूण नगरपालिकेत रस्ता नव्हता मी त्यावेळी विलास रावतेंना सांगितलं की ग्रामीण भागातील नगरपालिकेला जर आपल्याला ताकद आणि शक्ती द्यायची असेल व वाढत्या शहरीकरणाच्या दृष्टीने आपल्याला पायाभूत सुविधा निर्माण करायच्या असतील तर या नगरपालिकेला थेट अर्थसंकल्पामध्ये आपण तरतूद केली पाहिजे. आज येथे रस्ते अनुदान आहे, हे वैशिष्ट्यपूर्ण अनुदान आहे. या सर्व गोष्टी मी नगरविकास खात्याचा राज्यमंत्री असताना सुरू झाल्या, असे त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की अनेकवेळा आपल्याला रस्ता अनुदान मिळालं, अनेकवेळा आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण अनुदान मिळालं. यामुळे चिपळूण शहरात आपण पायाभूत सुविधा निर्माण करण्यात यशस्वी झालो. मी अर्थमंत्री असताना २४०० कोटीचा निधी मी ४००० कोटीवंर नेलेला आहे. निधी दुप्पट करून या जिल्ह्यामध्ये असलेल्या प्रत्येक नगरपरिषदेला जिल्हा नियोजनाच्या मंडळांमार्फत सुद्धा निधी मिळवून देण्याची तरतूद या महाराष्ट्रमध्ये मी केली.
जलसंपदा खात्याचा मंत्री म्हणून जेव्हा माझ्याकडे काही आले तेव्हा त्या अधिकाराचा वापर मी चिपळूण शहरामध्ये होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या योजनेसाठी केला. शहरामध्ये चोवीस तास मुबलक पाणी कसं निर्माण होऊ शकेल याची उपलब्धता भविष्यकाळात या नगरपालिकेच्या माध्यमातून निश्चित होईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही, असे मत त्यांनी मांडले.
महाराष्ट्रातील सरकारला मला काही प्रश्न विचारायचे आहेत. राज्यामध्ये सत्ता परिवर्तन झाले. पंतप्रधानांनी खूप घोषणा केल्या. आणि आमचं राज्य सुराज्य योजनेमध्ये पुढे जाईल असं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ठिकठिकाणी सांगितलं. काय झालं मुख्यमंत्री साहेब ? या चिपळूण शहरामध्ये सुराज्य योजनेला आम्ही मान्यता दिली. ५ डिसेंबरला विधिमंडळाचं अधिवेशन नागपूर येथे सुरू होत आहे. मी असेन, अजितदादा पवार असतील, पहिल्याच आठवड्यामध्ये हा प्रश्न उपस्थित करू. आम्ही मोठ्या अभिमानाने राज्याच्या प्रमुखांना सांगू की अनेक योजना या आमच्या सरकारच्या काळामध्ये सुरू झाली. कोणाचं सरकार राज्यामध्ये काम करतयं, कोणाची सत्ता नगरपरिषदेमध्ये आहे ते बघण्यापेक्षा या शहरामधल्या नागरिकांना सुविधा मिळणं अत्यंत गरजेचं आहे, असे ते याठिकाणी म्हणाले.

संबंधित लेख