दिलेले आश्वासन भाजपा कधी पूर्ण करणार – अनिल देशमुख

29 Nov 2016 , 09:18:25 PM

शेतकरी शेतमजुरांसाठी राष्ट्रवादीचा सावरगाव येथे चक्का जाम
अनिल देशमुखांसह हजारो कार्यकर्त्यांना अटक व सुटका


लोकसभा व विधानसभेच्या काळात भाजपाच्या केंद्रीय व राज्य सरकारने शेतकरी, शेतमजुर व सामान्य नागरिकांना अनेक आश्वासन दिले. परंतु सत्तेत येताच त्यांना या गोष्टीचा विसर पडला. निवडणुकीत दिलेले आश्वासन पाळण्यासाठी नसतात असा त्यांचा समज झाला आहे. भाजपा सरकार निवडणुकीत दिलेले आश्वासन कधी पूर्ण करतील, असा सवाल माजी मंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सावरगाव येथे धरणे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी भाजपा सरकारवर टीका करताना ते बोलले.

पुढे बोलतांना देशमुख म्हणाले की, निवडणुकीत आणि विरोधी पक्षात असतांना भाजपाचे नेते कापसाला ६५०० रुपये व सोयाबीनला ४००० रुपये भाव सत्तेच येताच देऊ असे सांगत होते. त्यांना या गोष्टी विसर पडला आहे. अडीच वर्षांच्या काळात दुष्काळग्रस्त परिस्थितीत कापूस सोयाबीन, संत्र्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारकडून एकाही पैश्याची मदत जमा झालेली नाही. विदेशातील काळा पैसा आणून प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रूपये टाकण्याचे आश्वासन निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी दिले होते. परंतु हा निवडणुकीत वापरण्याचा एक जुमला असल्याचे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगून कोणालाही १५ लाख मिळणार नाही असे म्हणत हात वर केल्याचीही टीका देशमुख यांनी केली.

ग्रामीण भागातील महिला बचत गटांना खाजगी कंपन्यांनी मोठया प्रमाणात कर्जाचे वाटप केले. दोन वर्षापासून सततची नापीकी आणि यावर्षी उत्पादन होऊनही शेतमालास बाजारात भाव नाही. यामुळे शेतकऱ्यांसोबतच शेतमजूरही पूर्णपणे मेटाकुटीस आला आहे. यामुळे घेतलेले कर्ज कसे फेडावे असा प्रश्न या महिलांना पडला आहे. महिलांकडून होणारी सक्तीची कर्ज वसुली थांबवावी नाहीतर येणाऱ्या दिवसात राष्ट्रवादी यापेक्षाही तीव्र आंदोलन करेल असा इशारासुध्दा देशमुख यांनी दिला.

यावेळी बोलतांना माजी आमदार सुनील शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिवसात वीज देवून संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी केली. धरणे आंदोलनानंतर अचानक सर्व कार्यकर्त्यांनी अनिल देशमुख यांचे भाषण संपताच उत्स्फुर्तपणे भाजपा सरकारच्या विरोधात टायरची जाळपोळ करीत रास्ता रोको करण्यास सुरुवात केली. दरम्यान पोलिसांनी अनिल देशमुख यांना अटक करण्याचा प्रयत्न केला असता कार्यकर्त्यांनी यास जोरदार विरोध केला. यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान पोलिसांनी अनिल देशमुख यांना अटक करुन सावरगाव येथील पोलिस चौकीत नेले. यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलिस चौकीला सुध्दा घेराव केल्याने वातावरण चांगले तापले. शेवटी पोलिसांनी अनिल देशमुख यांची सुटका केली.

या आंदोलनात अनिल देशमुख, सुनील शिंदे यांच्यासह सतीश शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नरखेड तालुका अध्यक्ष नरेश अरसडे, काटोलचे अध्यक्ष दिपक मोहीते, शंकरावजी धांडे, अप्पाजी दाडे, वसंत चांडक, अनु़प खराडे, उदय ठाकरे, गंगाधर मेटांगळे, नंदु मोवाडे, मनिष फुके, अनिल गोतमारे, वैभव दळवी, अरुण उमाठे, संजय कामडी, उमेश सावंत, राजु राउत, अमोल फुके, विरेंद्र आरघोडे, यांच्यासह शेतकरी, शेतमजूर, महिला ल व्यापारी मोठया संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख