नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या स्थानी – नवाब मलिक

05 Dec 2016 , 04:48:46 PM

भाजपकडून सत्ता, पैशांचा गैरवापर; एमआयएमची मदत घेतल्याचाही केला आरोप

नगरपालिका व नगरपंचायत निवडणुक निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर १९ ठिकाणी नगराध्यक्ष जिंकले आहेत. तर सातारा, म्हसवड, आष्टा, करमाळा, वडगाव, अमळनेर, चोपडा, रावेर या ८ ठिकाणी आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्ष जिंकलेले आहेत. दोन्ही मिळून पक्षाचे २७ ठिकाणी नगराध्यक्ष विराजमान झालेले आहेत. तसेच घड्याळ चिन्हावर ६८४ नगरसेवक तर आघाडीच्या माध्यमातून १६६ नगरसेवक विजयी झाले आहेत. दोन्ही मिळून ८५० नगरसेवक विजयी झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेस महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ , प्रदेश प्रवक्ते हेमराज शाह, क्लाईड क्रास्टो, संजय तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, या निवडणुकीत भाजप नेत्यांनी सत्तेचा व पैशाचा गैरवापर केला असून एमआयएम सारख्या धर्मांध पक्षाच्या खांद्यावर स्वार होऊन निवडणुकीत फायदा मिळवला असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. या निवडणुकीत भाजपचे जरी सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आले असले तरी २०१४ विधानसभा निवडणुकीत भाजपाला ४२ टक्के मिळालेल्या मतांमध्ये निम्मी घट झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत वाढ झाल्याचेही मलिक यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले १४ डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यात पुणे व लातूर जिल्ह्यात निवडणुका होणार आहेत. यामध्ये लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, निलंगा, उदगीर, औसा या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष स्वतंत्र चिन्हावर निवडणुका लढविणार आहे, तर पुणे जिल्ह्यातील तळेगाव-दाभाडे, सासवड, शिरुर, आळंदी या ठिकाणी आघाडीच्या माध्यमातून निवडणुक लढवणार आहे. या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रथम क्रमांकांचा पक्ष बनेल, असा विश्वास नवाब मलिक यांनी यावेळी व्यक्त केला.

संबंधित लेख