हिवाळी अधिवेशनात विरोधक सरकारला धारेवर धरणार : धनंजय मुंडे

05 Dec 2016 , 05:11:07 PM

केंद्राच्या नोटबंदी निर्णयानं राज्यातल्या शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी व छोट्या व्यापारी वर्गाचे मोठं नुकसान झालं असून ते दररोज वाढत आहे. समाजातल्या या गरीब घटकांचं नुकसान भरुन येणं शक्य नसल्यानं त्यांना शासनानं नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज केली. केंद्राच्या नोटबंदी निर्णयानं जनतेचे होणारे हाल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षणाचा रखडलेला निर्णय, बालकांचे कुपोषणाने होणारे मृत्यू, महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना, ढासळलेली कायदा सुव्यवस्था, मंत्र्याचा भ्रष्टाचार, मंत्र्यांकडून पद व गोपनीयतेचा भंग, नक्षलवाद रोखण्यात आलेले अपयश, वाढती महागाई, बेरोजगारीचा प्रश्न, मिहानमधील उद्योगांची रखडलेली स्थिती तसेच विदर्भाच्या विकासाच्या मुद्यावर या अधिवेशनात सरकारला धारेवर धरण्यात येईल, जाब विचारण्यात येईल, अशी माहिती मुंडे यांनी दिली.

उद्यापासून सुरु होत असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी घेतला. या निर्णयाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे बोलत होते. त्यावेळी त्यांनी अधिवेशनादरम्यान सभागृहात उपस्थित करण्यात येणाऱ्या संभाव्य विषयांची माहिती दिली. विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, शेकाप नेते भाई जयंत पाटील, रिपब्लिकन नेते जोगेंद्र कवाडे, आमदार सर्वश्री शरद रणपिसे, हेमंत टकले, प्रकाश गजभिये , माजी आमदार चंद्रकात छाजेड आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना राज्यातील कायदा-सु्व्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालल्याचे मुंडे म्हणाले. तसेच, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कुपोषण, औद्योगिक अधोगती अशा अनेक समस्यांना राज्याला सामोरे जावे लागत असल्याचे ते म्हणाले. राज्यातील नक्षलवादी चळवळीला पायबंद घालण्यात आलेले अपयश, विदर्भातील मिहान सारख्या प्रकल्पात जाहीर झालेले परंतू सुरू न झालेले उद्योग , ज्येष्ठ नागरिक, अपंग धोरण राबविण्यास होत असलेला विलंब, वाढती महागाई, मंत्र्यांचे भ्रष्टाचार व त्याला दिले जात असलेले संरक्षण, न्यायासाठी मोर्चे काढणाऱ्या शिक्षकांवर झालेले हल्ले, वाढती बेरोजगारी, आदी प्रश्नांमुळे समाजातील प्रत्येक घटकात अस्वस्थता निर्माण झालेली आहे, राज्यासमोरील महत्वाचे व गंभीर प्रश्न सोडविण्यात सरकारला अपयश आल्याची भावना जनतेत निर्माण झालेली असल्याने या जनभावनेचा आदर करून संवेदनशील विरोधी पक्ष म्हणून आपण मुख्यमंत्र्यांच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुंडे यांनी सांगितले.

संबंधित लेख