निर्णय चांगला पण अंमलबजावणीचे काय ? शरद पवारांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

05 Dec 2016 , 05:16:51 PM

नोटाबंदीचा निर्णय चांगला, मात्र त्यानंतरचे नियोजन चुकले, त्यामुळे डॉक्टरने ऑपरेशन चांगले करुनही काळजी न घेतल्याने रुग्ण दगावण्याची भीती आहे, अशा तीव्र शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली आहे. पुण्यात आयोजित केलेल्या इच्छुक उमेदवारांच्या प्रशिक्षण शिबीर कार्यक्रमात मार्गदर्शन करताना खा. शरद पवार बोलत होते. यावेळी खासदार वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे, पुणे शहराचे महापौर प्रशांत जगताप, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की कोणताही निर्णय घेण्याआधी पूर्वतयारी चांगली असावी लागते. काळ्यापैशांविरोधातील लढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसही सोबत आहे. सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय चांगला पण अंमलबजावणीचे काय ? नोटाबंदीतून लाभ काय झाला ? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.

नोटांबदीच्या निर्णयाला एक महिना होईल पण अद्याप परिस्थिती सुधारलेली नाही. नोटाबंदीनंतर समाजात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे असेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणतात कॅशलेस व्यवहार करा, भारतात ९२ टक्के व्यवहार हा चलनातून होतो, अमेरिकेत सुद्धा ५५ टक्के व्यवहार हा रोखीने होतो. देशातला शेतकरीही रोखीनेच व्यवहार करतो, सर्वांनाच कार्डने व्यवहार करणे जमत नाही तेव्हा कॅशलेस व्यवहार करण्याचे आवाहन करण्याआधी लोकांना कार्ड वापरायचे कसे हे सांगणे गरजेचे आहे असे मत यावेळी पवार यांनी व्यक्त केले.

मागील पाच वर्षांत पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर विश्वास टाकला आणि नगरसेवकांनी देखील चांगली कामे केली अशा शब्दांत पवार यांनी समाधान व्यक्त केले. तसेच राज्य सरकारकडून योग्य वेळेत भामा आसखेडसाठी निधी न मिळल्याने प्रकल्प रखडून राहिला अशी खंतही बोलून दाखवली. राज्यातील समस्या सोडवण्यासाठी पक्षविरहित निर्णय घेतले जाणे महत्वाचे आहे. हा माझा तो माझा असे करुन चालणार नाही.

महापालिकेच्या माध्यमातून विकास व्हायला हवा असेही ते म्हणाले. मेट्रोसाठी अनेक वेळा पुढाकार घेतला गेला पण त्याचे काय झाले काही कळले नाही, ३ वर्षांत जायका, मेट्रो आणि बीआरटीचे निर्णय या सरकारने घेतले नाही. लोकाभिमुख निर्णय घेण्यात हे सरकार साफ अपयशी ठरले आहे. त्यामुळे सर्वांनी उमेदवार म्हणून काम केल्यास नक्कीच यश मिळेल, तसेच राज्यकर्ता उत्तम असला म्हणजे राज्याचा गाडा चांगला चालतो असेही ते म्हणाले.

संबंधित लेख