खा. सुप्रिया सुळेंनी संसदेत ऐकवले सरकारला खडे बोल

11 Dec 2015 , 04:03:39 PM

लोकसभेमध्ये खा. सुप्रिया सुळे यांनी आज सरकारला खडे बोल सुनावले. 'आज डिजिटल इंडियाचे विचार सरकार मांडत आहे, याबद्दल निश्चित आनंद आहे. मात्र 'घर वापसी', 'पुरस्कार वापसी' आणि 'गोवंश मांसबंदी'सारख्या गोष्टी डिजिटल इंडियाला शोभणाऱ्या नाहीत', असा टोला सुळे यांनी सरकारला लगावला.

वाढत्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात साहित्यिकांकडून एकाच वेळी पुरस्कार परत दिले जात आहेत. पुरस्कार वापसीच्या अनेक घटना घडत आहेत. यावरूनसरकारने स्वपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. तसेच सरकारकडून योग्य निर्णयांची अपेक्षा आम्हाला आहे. शाहरुख खान आणि आमीर खान यांना टीकेचे लक्ष्य करणे सोडून द्या. या अभिनेत्यांचे त्यांच्या क्षेत्रातील योगदान जागतिक पातळीवर गौरवले गेले आहे. केवळ त्यांनाच नाही तर प्रत्येक नागरिकाला देशात सुरक्षित वाटायला हवे, ही सरकारची जबाबदारी आहे. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधानपदी असताना ते निष्पक्षपाती आहेत, असा विश्वास लोकांच्या मनात होता. असा विश्वास या सरकारने जनतेच्या मनात निर्माण करायची गरज आहे, असेही सुप्रियाताई यांनी संसदेत म्हटले.

डॉ. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांसारख्या मोठ्या व्यक्तींच्या हत्या या असहिष्णूतेचेच एक उदाहरण आहे. सनातन संस्थेचे नाव प्रकाशात आले असले तरी त्यांच्याविरुद्ध कोणतीही ठोस कृती कण्यात आलेली नाही. राजनाथ सिंह यांनी सनातनच्या बाबतीत खोलवर चौकशी करावी, अशी आमची त्यांना विनंती आहे. डॉ. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी योग्य तपासाची पावले उचलली जावीत, अशी मागणीही सुळे यांनी केली.

असहिष्णुतेबद्दल आपण चर्चा करत असताना महिलांच्या बाबतीतही आपली भूमिका सहिष्णू असावी, यासाठी प्रयत्न सरकारने केला पाहिजे. आरोग्य, शिक्षण अशा अनेक मुद्द्यांवर महिलांसाठी चांगले निर्णय घ्यायला हवेत. 'सब का साथ, सब का विकास' असे विद्यमान सरकारचे घोषवाक्य आहे. त्यांना अपेक्षित असलेल्या विकासात महिलांचाही समावेश हवा, असेही सुप्रियाताईंनी आपल्या भाषणात म्हटले.

संबंधित लेख