मराठा आरक्षणावर चालविलेला भातुकलीचा खेळ सरकारने बंद करावा - आमदार शशिकांत शिंदे

09 Dec 2016 , 09:08:16 PM

गुरुवारी विधानसभेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा पार पडली. या चर्चेत विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार शशिकांत शिंदे यांनीही या चर्चेत सहभाग घेतला.

महात्मा गांधीजींच्या नंतर अहिंसेच्या माध्यमातून विशाल आंदोलन उभे करण्याची किमया मराठा समाजाने करुन दाखवली आहे, अशा शब्दात त्यांनी मराठा मोर्चांची स्तुती केली. सरकारने नोटाबंदीच्या बाबतीत एका दिवसात निर्णय घेतला आणि त्याला देशभक्तीचे वलय दिले. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाचाही निर्णय झटकन घेऊन टाका असे आवाहन आमदार शिंदे यांनी सरकारला केले.

पुढे बोलताना ते म्हणाले की सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत भातुकलीचा खेळ सुरू आहे. सरकारमधले काही मंत्री म्हणतात धनगर समाजाला आरक्षण देणार तर आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा म्हणतात आरक्षण देणार नाही. मंत्र्यांनी एकत्र बसून एकदा काय ते ठरवावे आणि हा खेळ बंद करावा असेही ते म्हणाले. सरकारने मराठा समाजाच्या मोर्चांचा धसका घेतला आहे म्हणून चर्चेसाठी कोणताच मंत्री समोर येत नाही आहे. कोल्हापुरात पालकमंत्री मोर्चाचे निवेदन स्वीकारतील अशी भूमिका घेतली गेली होती मात्र विरोध झाल्यावर त्यांनाही निर्णय मागे घ्यावा लागला. शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या या आरक्षणाच्या लढ्याला कुठेही गालबोट लागेल असे कृत्य सरकारने करू नये असा इशाराही आमदार शिंदे यांनी सरकारला दिला. तसेच मुस्लिम, धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतही सरकारने लवकरात लवकर हालचाली कराव्यात अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

आपल्या भाषणा दरम्यान शशिकांत शिंदे यांनी कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांनाही टोला लगावला. ते म्हणाले , महादेव जानकर यांनी निवडणूक अधिकाऱ्याला स्वतःच्या उमेदवाराला कप-बशीचे चिन्ह देण्यासाठी धमकावल्याचा व्हिडिओ पाहिला. त्यापेक्षा जानकारांनी धनगर समाजाला आरक्षण देता की नाही, असे धमकावले असते तर बरे झाले असते.⁠⁠⁠⁠

संबंधित लेख