वसंतदादाचं योगदान महाराष्ट्राची जनता कधीही विसरणार नाही.– अजित पवार

09 Dec 2016 , 09:26:52 PM

महाराष्ट्र राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे शिक्षण फारसे झाले नव्हेत तरी देखील दादांचे व्यवहार ज्ञान प्रचंड होतं. त्यामुळे एखादी उच्चशिक्षित व्यक्ती देखील त्यांच्या पुढे फिके पडत असे इतके चौरस ज्ञान त्यांच्या जवळ होते.त्यामुळे दादा म्हणजे व्यवहार ज्ञानाचेएक विद्यापीठच होते. महाराष्ट्र राज्याच्या विकासात  व सहकार चळवळ उभी करण्यात दादांचे मोठे योगदान असून महाराष्ट्राची जनता हे योगदान कदापि विसणार नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार यांनी वसंतरावदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्त सभागृहात आपल्या भावना व्यक्त केल्या
   यावेळी बोलताना ते म्हणाले कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, सामान्य कुंटूबातील एखादी व्यक्ती जनतेशी असलेल्या बांधलिकीमुळे महाराष्ट्रा सारख्या राज्याची चार वेळा मुख्यमंत्री होते ही गोष्ट एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही.स्वातंत्र्य चळवळीत वसंतदादांचे मोठे योगदान राहिले आहे. सातारच्या प्रतिसरकारच्या माध्यमातून त्यांनी स्वतःला स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिले होते. त्यावेळी दादांना पकडण्यासाठी इंग्रजांनी  मोठे बक्षीस देखील जाहीर केले होते. पुढे दादांना अटक केल्यानंतर मिरजेच्या तुरुगांत ठेवण्यात आले होते. त्यावेळी दादा त्यांच्या सहकाऱ्यांसह तुरुंग फोडून बाहेर पडले होते. त्यावेळी झालेल्या गोळीबारात ते जखमी झाले होते.
   स्वातंत्र्य इतके योगदान असून देखील त्यांनी कधी आपण स्वातंत्र्य सैनिक असल्याचे भांडवल केले नाही.स्वातंत्र्य सैनिक ते राज्याचे मुख्यमंत्री असा दादांचा प्रवास प्रेरणादायी स्वरुपाचा आहे. मुख्यमंत्री असताना दादांनी ऊस शेती संशोधन व तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी पुण्यातील मांजरी येथे ऊस संशोधन केंद्राची स्थापना केली. आज हे केंद्र वसंतदादा शुगर इन्स्टियुट म्हणून ओळखले जाते. आज ऊसशेती संशोधन आणि तंत्रज्ञान विकसित करण्यात या संस्थेचा मोठा वाटा आहे. त्याकाळी महाराष्ट्रात पॉलिटेक्नीक व इंजिनिअरिंग कॉलेजची संख्या कमी होती, त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना कर्नाटक तसेच आंध्रप्रदेश सारख्या राज्यात जावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन दादांनी महाराष्ट्रात पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंग कॉलेजची संख्या वाढवली.त्याचा लाभ आज हजारो विद्यार्थ्यांना होत आहे.
पुढे बोलताना ते म्हणालेपुलोद सरकार निर्मितीच्या वेळी नाशिकराव तिरपुडे हे काँग्रेस आयचे नेते होते. त्यावेळी वसंतदादांचे व त्यांचे मतभेद निर्माण झाले होते. राजकीय घडामोडी होऊन शरदराव पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोद सरकार सत्तेत आले व मुख्यमंत्री असलेल्या वसंतरावदादांना आपले पद सोडावे लागले. परंतु आपले पद जाऊन देखील त्यांनी कधी प्रतिशोधाची भावना मनात ठेवली नाही.कोणाचा राग केला नाही. ऊलट या राज्याला शरद पवारच पुढे नेऊ शकतात त्यामुळे आता तुम्ही शरद पवार यांच्या नेतृत्वातच काम करा असे आदेशच दादांनी कार्यकर्त्यांना दिले. इतक्या मोठ्या मनाचे वसंतदादा होते.
        दादांचे राहणीमान साधे होते.त्यामुळे मुख्यमंत्री असताना देखील त्यांच्या भोवती कार्यकर्त्यांचा नेहमी गराडा असायचा. कार्यकर्त्यांच्या पाठिशी ते नेहमी खंबीरपणे उभे असायचे. एकदा आर.आर.पाटील यांना तासगावच्या सभेत मारहाण झाल्यानंतर दादा स्वतः हातात बंदूक घेऊन तासगाव गेले व मारहाण कऱणाऱ्या लोकांना खुले आव्हान दिले . कार्यकर्त्यांच्या पाठिशी उभे राहणारा असा नेता दुर्मीळ असल्याचे यावेळी अजित पवार यांनी सांगितले. कामाची धडाडी व जनसामान्यांशी असलेले भावनिक नाते यामुळे चांद्या पासून बांद्या पर्यंतच्या लोकांचे ते खऱ्या अर्थाने दादा झाले होते.जनतेच्या मनात त्यांचे आदरयुक्त स्थान होते. यंदाचे वर्ष वसंतदादाचे जन्म शताब्दी वर्ष असून दादांच्या विचारांनी सर्वांनी चालण्याचा प्रयत्न करणे ही दादांना खरी श्रध्दाजंली ठरेल अशा शब्दात अजित पवार यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.

संबंधित लेख