राज्यातील पाच लाख विद्यार्थी शाळाबाह्य – आ.प्रकाश गजभिये

15 Dec 2016 , 06:31:17 PM

राज्यातील पाच लाख विद्यार्थी शाळाबाह्य असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधान परिषदेचे आमदार प्रकाश गजभिये यांनी शुक्रवारी सभागृहात दिली. विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण देणे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. शाळाबाह्य विद्यार्थी शोधण्यासाठी सरकारने सर्वेक्षण केले होते. यात ७४ हजार शाळाबाह्य विद्यार्थी आढळून आले आहेत. यातील ५० हजार विद्यार्थ्यांना शाळांत प्रवेश दिला असून २५ हजार विद्यार्थी शाळाबाह्य असल्याची माहिती सरकारने दिली होती. ही माहिती साफ चुकीची असल्याचा दावा आमदार प्रकाश गजभिये यांनी केला आहे. ७०० ते ८०० स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या सर्व्हेनुसार राज्यात पाच लाख विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचे आढळून आले आहेत अशी माहिती त्यांनी सभागृहाला दिली. ही अत्यंत गंभीर बाब असून शिक्षण खाते काय करते, असा प्रश्नही त्यांनी निर्माण केला.

पुढे बोलताना गजभिये म्हणाले की, शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या नेमकी किती आहेत यासाठी पुन्हा सर्व्हे करणार असल्याचे आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी सभागृहात दिले आहे. मात्र मागच्या अधिवेशनातही असेच आश्वासन दिले गेले होते, पण अचूक माहिती दिली जात नाही. ऊस तोड कामगार, विटभट्टीवर काम करणारे कामगार, शेतमजूर तसेच शेतकऱ्यांची मुले शाळेत प्रवेश घेऊ शकत नाहीत. त्यामुळे कामगार आहेत त्याठिकाणी वसतिगृह उभारून त्यांच्या मुलांना शिक्षण द्यावे अशी मागणी आ. गजभिये यांनी तारांकित प्रश्नाद्वारे केली. मागच्या दोन वर्षात सरकारने या विषयात कुठलीही प्रगती केलेली नाही.
मुख्यमंत्र्यांनी या विषयात स्वतः लक्ष घालून पुन्हा एकदा शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून सर्व्हे करावा आणि सरकारने याबाबत गंभीर विचार करावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

संबंधित लेख