मंत्र्यांना पुरेसा वेळ देऊनही जर सदस्यांना उत्तरे मिळत नसतील तर उपयोग काय ? - जयंत पाटील

15 Dec 2016 , 06:38:20 PM

शुक्रवारी विधानसभेत तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी कामकाज क्रमात दाखवलेल्या लक्षवेधी सुचना पुढे ढकलण्यात येत असल्याचे जाहीर केले. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी हरकत घेत सभागृहाच्या कामकाजावर आपली नाराजी व्यक्त केली.
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की ज्या वेळी एखाद्या महत्वाच्या विषयासंदर्भात सदस्यांकडून लक्षवेधी सूचना मांडली जाते. त्यावेळी त्या विषयावर संबधित विभागाच्या मंत्र्याकडून ठोस उत्तर मिळावे अशी सदस्याची अपेक्षा असते. त्यामुळे तो सदस्यही त्या विषयासंदर्भात सर्व अभ्यास करुन आलेला असतो. परंतु सभागृहात आल्यावर त्या सदस्याला कळते की लक्षवेधी सुचना पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शासकीय कामकाजाची ही पध्दत योग्य नाही. संबधित मंत्र्याची जबाबदारी आहे की त्यांना दिलेल्या वेळेत या लक्षवेधी सुचनेसंदर्भातील सर्व माहिती घेऊन त्याचे उत्तर सभागृहात दिले पाहिजे. परंतु पुरेसा वेळ दिलेला असताना देखील जर मंत्र्याकडून उत्तरे मिळू शकत नसतील तर सरकार मधील मंत्र्याचे ते अपयश आहे. अध्यक्षांनी अशा मंत्र्यांना ताकीद देण्याची विनंती विधानसभा अध्यक्षांना केली. यावर तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी तशा सूचना सभागृहातील उपस्थित मंत्र्यांना दिल्या.

संबंधित लेख