९ जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून नोटबंदी विरोधात राज्यव्यापी आंदोलन - नवाब मलिक

04 Jan 2017 , 06:53:49 PM

काळेधन संपवण्यासाठी तसेच दहशतवाद्यांशी मुकाबला करण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला असे म्हटले जात होते. या निर्णयाचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केले होते. मात्र पंतप्रधान मोदींचा हा निर्णय पूर्णतः फसला असल्याची टीका राष्ट्रावादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली. या नोटबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. व्यापार मंदावले आहेत. अतिरिक्त कामाच्या बोज्यामुळे बॅंकेचे कर्मचारी हैराण आहेत. अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. सर्वात जास्त परिणाम हा शेतकरी बांधवांवर झाला आहे. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतमाल रस्त्यावर फेकून आपला आक्रोश व्यक्त करत असल्याचे नवाब मलिक म्हणाले. नोटाबंदीमुळे संपूर्ण देशात आर्थिक मंदीचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशा शब्दांत त्यांनी खंत व्यक्त केली. जनतेच्या आक्रोशाला आवाज देण्यासाठी ९ जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभरात आंदोलन करणार आहे, हे नमूद करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी प्रत्येक जिल्ह्यात सांविधानिक पद्धतीने आंदोलन करतील, असे आश्वासनही मलिक यांनी दिले.

संबंधित लेख