धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ देणार नाही - सुनील तटकरे

17 Jan 2017 , 01:05:08 AM

विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आघाडी झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस दोन आणि काँग्रेस तीन जागा लढवणार आहेत. औरंगाबाद शिक्षण मतदारसंघात विक्रम काळे  हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार तर कोकण शिक्षक मतदारसंघात शेकापचे बाळाराम पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुरस्कृत उमेदवार असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ठाण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. राज्यातील इतर ठिकाणी निवडणुकांमध्ये आघाडी करण्याबाबत काँग्रेसशी बोलणी सुरू असून ठाण्यात निश्चितपणे आघाडी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ठाणे मनपाबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते  नारायण राणे  यांच्याशी चर्चा झाली असून येत्या दोन दिवसात अधिकृतरित्या निर्णय घेतला जाईल, तसेच धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये, याची काळजी घेतली जाईल, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. येत्या १९ तारखेला राज्याच्या पार्लमेंट्री बोर्डची बैठक होणार आहे, या बैठकीत उमेदवारांबाबत चर्चा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणतात की, काँग्रेस-राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आमची युती आहे. पण काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी ही धर्मनिरपेक्ष विचारांची आघाडी असून सत्ता येते-जाते पण कोणीही कोणालाही संपवू शकत नाही, असे प्रत्युत्तर तटकरे यांनी दिले. युतीसाठी भाजप पारदर्शक कारभाराची अट घालत आहे. म्हणजेच २२ वर्षे मुंबई मनपात पारदर्शक कारभार नव्हता, असा टोला त्यांनी लगावला. सेना-भाजपची गेल्या अडीच वर्षातील भांडणे पाहता कोण कोणाला मुक्ती देतंय याचा नेम नाही, अशी टीकाही तटकरे यांनी केली. यावेळी माजी मंत्री गणेश नाईक, विधानपरिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे, आ. पांडुरंग बरोरा, शेकापचे आ. जयंत पाटील, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद पराजंपे, शेकापचे कोकण शिक्षक मतदार संघाचे उमेदवार बाळाराम पाटील उपस्थित होते.


संबंधित लेख