बस्स झाले घोटाळे... मुंबई महापालिकेत आता सत्तापरिवर्तनाची गरज – सुप्रिया सुळे

17 Jan 2017 , 10:25:54 PM

मुंबई महानगरपालिकेत खूप घोटाळे झाले, आता इथे परिवर्तनाची गरज आहे, शहराचा विकास घडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मुंबईत सत्ता हवी आहे, असा नारा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी महापालिकेच्या निवडणुकीसाठीचे रणशिंग फुंकले. सुळे यांनी आपल्या तीन दिवसीय मुंबई प्रचार दौऱ्याची सुरूवात करत आज राष्ट्रीय मिल मजदूर संघ येथे महिला मेळाव्याला संबोधित केले. यावेळी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर, आमदार विद्या चव्हाण, मुंबई महिलाध्यक्ष सुरेखा पेडणेकर, मुंबई युवती अध्यक्ष अदिती नलावडे, नगरसेविका रत्ना महाले, मिनाक्षी पाटील उपस्थित होत्या.
रस्ते घोटाळा, टॅब घोटाळा, कचरा घोटाळा अशा भ्रष्टाचारात अडकलेल्या महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना हटवून आता परिवर्तनाची कास धरणे गरजेचे असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. मुंबईत आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही. लोकांना आपल्या मुलींना रात्री अपरात्री बाहेर पाठवण्यास भीती वाटते हे प्रशासनाचे अपयश असल्याचे सांगत त्यांनी शहरातील महिलांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली. तसेच स्व आर. आर. पाटील हे गृहमंत्री असताना महाराष्ट्रात सर्वात जास्त महिला पोलीसांची त्यांनी नियुक्ती केली होती, याची आठवण त्यांनी जागवली.
मुंबई शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे, मनपात सर्वात जास्त भ्रष्टाचार झाला आहे. केंद्र सरकार मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू करण्याचे स्वप्न दाखवत आहे. पण आधी त्यांनी मुंबईकरांना लोकलची उत्तम सुविधा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर हजारो कोटींच्या प्रकल्पांचे स्वप्न दाखवले जात आहेत पण हे पैसे आहेत कुठे? असा खडा सवाल त्यांनी केला.
गेल्या दोन वर्षात एकही स्वच्छतागृह उभारले नाही, शाळेतील मुलींना स्वच्छतागृहे उभारणार असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते, पण त्याची पूर्तता केली गेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यास प्रत्येक वॉर्डमध्ये स्वच्छतागृह बांधू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मनपात माफियाराज आहे असे आरोप भाजपचे मुंबई अध्यक्ष करत आहे. मुख्यमंत्री म्हणतात पारदर्शक कारभार हवा, मग मुख्यमंत्र्यांनी गेली अडीच वर्षे याबाबत चौकशी का केली नाही ? गृहमंत्र्यांनी अडीच वर्ष काय केलं? असा थेट सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला.
विकासाचे आदर्श मॉडेल पुण्यात राबवले जात असल्याचे सुळे यांनी सांगितले. पुण्यात एक वॉर्ड असा नाही जिथे पालिकेचं रुग्णालय नाही. वेगळी मॅटर्निटी रुग्णालये आहेत. लहान मुलांसाठी मिल्क बँक बनवणारे पुणे हे देशातले पहिले शहर आहे. पुण्यात एक विभाग सोडून नाट्यगृहे आहेत, ज्याची संपूर्ण जबाबदारी पालिकेकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने हा विकास घडविला असून मुंबईतही अशाच विकासाची गरज असल्याचे सुळे म्हणाल्या.
मतांसाठी जातीचे राजकारण केले जाते आहे, समाजात द्वेष निर्माण केला जात आहे याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. आपण जे केले, भविष्यात जे करणार आहोत ते जनतेसमोर मांडा, आत्मचिंतन करा, जनतेने संधी मिळाली तर आपण निश्चितच मुंबईचे परिवर्तन करू, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
दरम्यान, राष्ट्रवादी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनीही कार्यक्रमात मनपाच्या ढिसाळ कारभारावर टीका केली. मुंबईतील शाळांची, रस्त्यांची, आरोग्यसेवेची परिस्थिती बिकट आहे. मुंबई मनपातर्फे सुविधा पुरवली जात नाही. मनपाच्या शाळांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांना असंख्य हालअपेष्टांना सामोरे जावे लागते, अशी खंत अहिर यांनी व्यक्त केली. मनपातील भ्रष्टाचाराला शिवसेना जेवढी जबाबदार आहे तेवढीच भाजपही जबाबदार आहे. दोघांच्या संगनमतानेच २२ वर्ष घोटाळे झालेत, असा आरोप त्यांनी करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा एकमेव पक्ष आहे जो मुंबईचा विकास करू शकतो, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शिवसेना-भाजपने गेली २२ वर्षे मुंबईकरांना वेठीस धरले आहे आणि आज भाजप जबाबदारीतून हात झटकत आहे. मनपातील भ्रष्टाचाराला भाजपही तितकीच जबाबदार आहे. भाजप हा देशासाठी घातक पक्ष आहे, हे लोण देशभर पसरता कामा नये, यांना वेळीच आळा घालायला हवा, असे मत राष्ट्रवादीच्या आ. विद्या चव्हाण यांनी व्यक्त केले तर राष्ट्रवादीच्या मुंबई महिलाध्यक्ष सुरेखा पेडणेकर यांनी उमेदवारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले. मुंबई शहरात परिवर्तन घडवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे त्यामुळे आपला उमेदवार निवडून येण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा, असेही त्या म्हणाल्या.

संबंधित लेख