भाजपतर्फे गुंडापुंडांना पक्षात प्रवेश – अजित पवार

18 Jan 2017 , 01:30:29 AM

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे कार्यकर्त्यांना आयात करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपतर्फे गुंडापुंडांना पक्षात प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे आता भाजप गुंडांचा पक्ष म्हणून ओळखला जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली. पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ज्यांना तडीपार करण्यात आले आहे, ज्यांच्यावर खून, दरोडा इत्यादी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे अशा लोकांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. भाजपच्या या निर्णयावर आरएसएसनेही नाराजी व्यक्त केली आहे. कोणी कोणाला पक्षात प्रवेश द्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण सर्व पक्षांनी योग्य लोकांना पक्षात घ्यावे, कारण ते पुढे लोकप्रतिधी म्हणून समाजात वावरतात, असे मत पवार यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांसाठी सन्मानपूर्वक आघाडी करण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे. पण आघाडी होत नसेल तर आमची संपूर्ण १२८ जागा लढण्याची तयारी आहे. मात्र सेक्यूलर मतांचे विभाजन होऊ नये ही पक्षाची भूमिका असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. तसेच कार्यकर्त्यांशी चर्चा करून उमेदवारांबाबत योग्य तो निर्णय येत्या काही दिवसात घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

संबंधित लेख