भाजपची भूमिका दुटप्पी – सुप्रिया सुळे

19 Jan 2017 , 05:20:51 AM

एका बाजूला शिवसेनेला भ्रष्टाचारी म्हणायचे आणि दुसर्या  बाजूला त्यांना घेऊनच सरकार चालवायचे, ही भाजपची दुटप्पी भूमिका आहे, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. राष्ट्रवादी मुंबई काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ खासदार सुप्रिया सुळे यांनी आज ईशान्य मुंबईत दुसर्याे दिवशीचा दौरा पूर्ण केला. मुंबई अल्पसंख्याक विभागाच्यावतीने घाटकोपर येथे मेळाव्यास मार्गदर्शन तसेच कार्यालयाचे उदघाटन सुळे यांनी केले, त्यावेळी त्या बोलत होत्या. घाटकोपर येथील वॉर्ड क्रमांक १३१ मधील राखी जाधव, वॉर्ड क्रमांक १२४ मधील ज्योती हारून खान आणि विक्रोळी येथील वॉर्ड क्रमांक १२० मधील चारू चंदन शर्मा यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटनही सुळे यांनी केले. यावेळी बोलताना सुळे यांनी भाजपवर कडाडून टीका केली. भाजप-सेना सत्तेत आल्यापासून १००० कोटी जाहीरातींवर खर्च केले, हे पैसे मुंबई मनपाच्या शाळांमधील शिक्षणावर खर्च केले असते तर विद्यार्थ्यांना चांगल्या सोयी सुविधा मिळाल्या असत्या, असा आरोप त्यांनी केला. तसेच केंद्रसरकारवार निशाणा साधत सुळे यांनी डिजीटल इंडियाच्या गप्पा केंद्रसरकार करते पण वास्तवात संसदेतलंही वायफाय चालत नाही, अशी टीका केली. संसदेतलंच वायफाय चालत नसेल तर देशातले इतर ठिकाणचे कसे चालेल? बहुतेक 'जियो'ला कंत्राट दिलेले नाही, त्यांना दिले की वायफाय चालेल असा टोला त्यांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या मुंबई मनपा निवडणुकीच्या पहिल्या यादीत सर्वात जास्त महिला आहेत, असा सर्वसमावेशक असलेला राष्ट्रवादी हा एकमेव पक्ष असल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले.
यावेळी राष्ट्रवादी मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर, मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, मुंबई अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष सुहेल सुभेदार, मुंबई महिलाध्यक्ष सुरेखा पेडणेकर, मुंबई युवती अध्यक्ष अदिती नलावडे, ईशान्य मुंबई अध्यक्ष संजय दिना पाटील, नगरसेवक हारून खान आणि सुधाकर वड्डे उपस्थित होते.

संबंधित लेख