देशाची सेवा करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य- शरद पवार

11 Dec 2015 , 05:54:28 PM

आजचा दिवस माझ्यासाठी सौभाग्याचा दिवस आहे. माझ्या वैयक्तिक जीवनाची पंच्याहत्तरी पूर्ण करत असतानाच, माझ्या राजकीय कारकिर्दीची ५५ वर्षे, आणि माझ्या संसदीय कारकिर्दीची ५० वर्ष पुढील वर्षी पूर्ण होत आहेत. अशा प्रसंगी देशातील सन्माननीय व्यक्तींच्या समोर आज दोन शब्द बोलण्यास मी उभा आहे. म्हणूनच हा माझ्यासाठी सौभाग्याचा दिवस आहे, असे मी म्हणतो. इतकी वर्ष लोकांनी मला महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी काम करण्याची संधी दिली आहे. माझी योग्यता काय आहे, समाजाची आणि देशाची सेवा करण्याचा मी कितपत प्रयत्न केला आहे, हे मी सांगू शकत नाही. परंतु आज इथे राजकीय, उद्योग, मिडीया या सर्व क्षेत्रातील व्यक्तींची उपस्थिती पाहून जे प्रयास आणि परिश्रम मी केले त्याची पोचपावतीच या सर्वांकडून मला मिळते आहे, अशी भावना मनामध्ये निर्माण झाली आहे. इथे असलेली उपस्थिती पाहून मी भारावून गेलो आहे. 

१९६७ साली मी पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलो. तेव्हापासून आजतागायत विधानसभा असेल वा संसद, देशासाठी काम करण्याची संधी मला लोकांनी दिली. ज्यांनी मला सर्वप्रथम विधानसभेवर निवडून दिले, बारामती असो की महाराष्ट्र, सलग चौदा वेळा मला जिंकून आणण्याचे काम ज्यांनी केले त्या माझ्या सर्व मतदारांचे मी आभार मानतो. त्यांचा विश्वास आणि समर्थन यांनीच आज मला इथपर्यंत पोहोचवले आहे. 

वयाच्या अठराव्या वर्षी मी काँग्रेसमध्ये आलो आणि युवा काँग्रेसचे काम सुरु केले. माझी मेहनत लक्षात घेऊन त्यावेळचे महाराष्ट्राचे नेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी मला संघटनेत, संसदीय क्षेत्रात, शासनामध्ये काम करण्याची मोठी संधी दिली. यशवंतराव चव्हाण हे देशाचे खरे सुपुत्र होते. स्वातंत्र्य सेनानी होते. स्वातंत्र्योत्तर काळात पंडित नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी यांच्या सोबतीने देशाचा चेहरा मोहरा बदलण्यात ज्यांचे  महत्त्वपूर्ण योगदान आहे त्यातील यशवंतराव चव्हाण हे एक आहेत. राजकारणात विशेषतः संसदेत काम करण्याचा एक आदर्श त्यांनी आमच्यासमोर ठेवला. त्यांचा हा आदर्श समोर ठेवूनच आम्ही काम करत आहोत. इतक्या वर्षात विधानसभा, राज्यसभा, लोकसभा कुठेही एक दिवसही असा आला नाही की सभागृहाच्या मर्यादांचे आम्ही उल्लंघन केले आहे. कोणत्याही सभागृहात असो त्याची मर्यादा सोडून आम्ही वागलो नाही. संसदेच्या कामकाजात कधीही अडथला आणला नाही. आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून संसदेत पाठवणाऱ्या जनतेला लोकशाही आणि संसदेच्या कामकाजाबद्दल आदर असतो, त्यांची भावना असते की कामकाज सुरळीतपणे  चालायला हवे. जनतेचे प्रश्न समोर आले पाहिजेत, लोकांच्या समस्या समोर यायला हव्यात, आवश्यक दुरुस्त्या व्हायला हव्यात. यशवंतराव चव्हाणसाहेबांकडून हे संसदीय शिष्टाचार आणि मर्यादा शिकण्याची संधी मिळाली, याचा मला आनंद आहे. मला गर्व आहे की १२५ कोटी लोकसंख्या असलेला बहुभाषिक, बहुधर्मिक हा देश, जगातील सर्वात मोठी लोकशाही  असलेला देश आहे. ज्याला संपूर्ण जग भविष्यातील महासत्ता म्हणून बघते आहे. म्हणून आपल्या सर्वबहुल, धर्मनिरपेक्ष, सहिष्णू, आपल्या विविधतेची समृद्धी जपत, विकासाच्या पथावर आपण मार्गक्रमण करू, असा मला विश्वास आहे. 
आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या माध्यमातूनच गरिबी व कमतरतांना दूर केले जाऊ शकते, हा माझा दृढअनुभव आहे. म्हणूनच राज्यासाठी, देशासाठी काम करताना मी विकासाला सर्वप्रथम प्राधान्य दिले. तेच माझे लक्ष्य होते. विकासाद्वारेच धर्म, क्षेत्र, भाषा याच्या पलीकडे जाऊन जनतेमध्ये सद्भाव आणि एकता निर्माण केली जाऊ शकते. सर्वांना सुख, समृद्धी आणि सन्मान मिळवून देण्याचे 'विकास' हाच एकमेव पर्याय आहे. माझ्या आयुष्यातील कित्येक वर्षे शेतकऱ्यांसाठी काम करण्यात गेली आहेत. त्यांच्या प्रश्नांवर अनेक वर्षे मी  काम केले आहे. २००४ मध्ये देशाचा कृषिमंत्री बनण्याची संधी डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली मला मिळाली. तेव्हा देशासमोर आयात करण्याखेरीज पर्याय नव्हता. माननीय पंतप्रधानांनी याबाबत मला विचारणा केली होती. देशाला आयातीशिवाय पर्याय नाही याची मलाही जाणीव होती. मात्र माझे मन त्यासाठी तयार होत नव्हते. इतका मोठा देश, शेतीच्या क्षेत्रात कठोर परिश्रम करणारे शेतकरी, असे असतानाही आपल्याला धान्य आयात करावे लागते, याचे मला दु:ख्ख होत असे. त्यानंतर देशाला शेतीत स्वयंपूर्ण करण्याचे मी प्रयत्न केले. शेतकरी बांधव आणि शेती संशोधन क्षेत्रातील व्यक्तींचा मी आभारी आहे, की त्यांच्या सहकार्याने आज भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनलेला असून एक मोठा निर्यातदार देश म्हणून ओळखला जातो.  आज भारत हा तांदूळ निर्यात करणारा पहिल्या क्रमांकाचा देश बनला आहे. गहू, साखर आणि कपाशीची निर्यात करणारा भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. 

वयाची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण करत असताना आई-वडिलांचे मला स्मरण होते आहे. माझ्या वडिलांनी सहकार चळवळीत काम केलेय हे सर्वश्रुत आहे. पण अनेकांना माहित नसेल की माझी आई ही स्वातंत्र्यपूर्व काळात पुण्यातील पंचायतसमितीत कॉंग्रेसच्या वतीने निवडून येणारी पहिली महिला होती. तिने सतत शिक्षणाला प्राधान्य दिले आणि नवीन पिढी कशी शिक्षित बनेल यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. शिक्षणक्षेसाठी तिचे योगदान सतत राहिले. तिचे हे संस्कार माझ्या मनावर ठसले असल्यामुळे राजकारणाप्रमाणेच शिक्षणाबद्दल मला विशेष आस्था आहे. शिक्षणाशिवाय विकास आणि आदर्श नागरिक बनण्याची प्रक्रिया शक्य नाही असे माझे ठाम मत आहे. विशेषतः स्त्री-शिक्षणाबद्दल मी आग्रही राहिलो आहे आणि कोणत्याही समजाला सशक्त समाज बनवण्यासाठी महिला शिक्षण आणि महिला सक्षमीकरण ही प्राथमिक आवश्यकता आहे. कधी कधी मी आत्मविश्लेषण करतो. माझ्यातील उणीवा दूर करण्याचा प्रयत्न करतो. 

आपण सर्व सन्माननीय व्यक्ती इथे आलात, शुभेच्छा देऊन आपण माझा सन्मान वाढवलात, याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. आपणा सर्वाना धन्यवाद देतो.

संबंधित लेख