काँग्रेस पक्षासोबत आघाडीबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात – सुनील तटकरे

27 Jan 2017 , 06:25:08 PMराज्यात समविचारी पक्षांशी आघाडी करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सकारात्मक असून त्या दृष्टीने अनेक जिल्ह्यात काँग्रेस पक्षासोबत आघाडी करण्याबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, युवती प्रदेशाध्यक्षा स्मिता पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष निरजंन डावखरे, प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, संजय तटकरे, प्रदेश चिटणीस संजय बोरगे व युवक उपाध्यक्ष रविकांत वर्पे उपस्थित होते.
दरम्यान, आज राष्ट्रवादी भवन येथे पक्षाच्या राज्य पार्लमेंट्री बोर्डची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांबाबत चर्चा झाली. या दरम्यान बारामतीचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद काकडे व त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. या बैठकीविषयी माहिती देताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, राज्यातील २५ जिल्ह्यात काँग्रेस पक्षासोबत आघाडी करण्याबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. तसेच पुणे, सोलापूर, पिंपरी-चिंचवड, ठाणे, अकोला आणि अन्य महापालिकांमध्ये आघाडीबाबत चर्चा सुरू आहे. २७-२८ तारखे पर्यंत आघाडी बाबत निर्णय घेण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
राज्यात कुठेही छुपी आघाडी केली जाणार नाही. कुणी कार्यकर्ता पक्षाचा एबी फॉर्म घेऊन स्थानिक पातळीवर शिवसेना–भाजपा सोबत आघाडी करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा यावेळी सुनील तटकरे यांनी दिला तसेच काँग्रसेनेही याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी अपेक्षा सुनील तटकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

संबंधित लेख