पुण्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा मेळावा संपन्न

27 Jan 2017 , 06:48:00 PM

राष्ट्रवादीच्या विकासकार्याचे जनता योग्य मुल्यमापन करेल – अजित पवार
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा भव्य मेळावा पुण्यात पार पडला. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मेळाव्यास उपस्थित विद्यार्थी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील ,खासदार वंदना चव्हाण,पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, माजी आमदार बापू पाठारे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस माजी शहराध्यक्ष मंगेश गोळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋषी परदेसी आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी केलेली आंदोलने ही अत्यंत गौरवास्पद आहेत. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा 'महाविद्यालय तिथे शाखा' हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून या उपक्रमामुळे महाविद्यालयीन स्तरावर पक्ष संघटना बळकट होईल आणि नवीन विद्यार्थी पाक्षाला जोडला जाईल. त्यामुळे पक्षाचा विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सत्तेत असलेल्या भाजपावर टीका करताना ते म्हणाले की, भाजपा खोट्या आश्वासनांची खैरात करत, लोकांची फसवणूक करून सत्तेत आली. त्यात केंद्र सरकारने कोणतीही पूर्वतयारी न करता नोटाबंदी सारखा जुलमी निर्णय घेतला. भाजपा सत्तेत आल्यास अच्छे दिन येईल, महागाई कमी होईल, शेतकरी सुखी होईल अशी खोटी आश्वासने देण्यात आली. पण एकाही गोष्टीवर त्यांनी काम केले नाही. युवक, विद्यार्थी, महिला, शेतकरी, व्यापारी असा एकही घटक या सरकारच्या काळात सुखी नाही. भाजपा कशाप्रकारे जनतेची दिशाभूल करत आहे याचा विद्यार्थी संघटनेने पर्दाफाश करावा अशी सुचना त्यांनी केली. पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या विकासावर बोलताना पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जे विकासकार्य हाती घेतले आहे त्याचे योग्य मुल्यमापन येथील जनता करेल असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

संबंधित लेख