स्वच्छ व सुरक्षित मुंबई हे माझे स्वप्न - सुप्रिया सुळे

29 Jan 2017 , 12:26:08 AMमुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खा. सुप्रिया सुळे यांनी  फेसबुक लाइव्हद्वारे मुंबईकरांशी संवाद साधला. या दरम्यान मुंबईकरांना आरोग्य, शैक्षणिक मुद्दे, महिला सुरक्षा, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न, नागरी समस्या, पर्यावरण अशा अनेक मुद्द्यांवर सुळे यांना थेट प्रश्न विचारले तसेच मुंबईतील नागरी समस्यांविषयी त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी बोलताना अनेल मुद्द्यांवर सुळे यांनी मोकळेपणाने आपली मते मांडली. मुंबईचा विकास हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ध्येय असून स्वच्छ, सुंदर, हरित मुंबईसाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील असेल, हे सुळे यांनी स्पष्ट केले. मुली-महिला यांच्यासाठी मुंबई शहर अधिक सुरक्षित व्हावे, हे आपले स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेत सत्तेत आल्यास मुंबईतील प्रत्येक वॉर्डामध्ये स्वच्छतागृहे व शौचालये उभारण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न असेल, असेही त्या म्हणाल्या.  ज्या महापालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे, तिथे हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतही सत्ता मिळाल्यास हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन त्यांनी दिले. बीडीडी चाळीचा जो पाण्याचा प्रश्न आहे त्याच्यावर जास्तीत जास्त पाणी लोकांना कसं मिळेल यासाठी चांगलं नियोजन नक्की करण्याचा आम्ही प्रयत्न करू, नवी मुंबई, पुणे येथे पाण्याचा प्रश्न आम्ही यशस्वीपणे सोडवला आहे,मुंबईत जर सत्ता आली तर पाण्याचं नियोजन चांगल्या तऱ्हेने करू, असे सुळे यांनी सांगितले. तसेच भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी जनतेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध असल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले. काँग्रेसबरोबर युती व्हावी व धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षांनी एकत्र निवडणुक लढवावी, हीच आपली इच्छा असून सगळ्याच स्तरावर आमचे सगळयांचे प्रयत्न सुरू आहेत. 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी प्रत्येक गाव, प्रत्येक वाडी-वस्ती, महत्वाळ्ची आहे. प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता पाठीशी आहे. ५० वर्षे आदरणीय पवार साहेबांना महाराष्ट्राच्या जनतेने साथ दिली आहे, त्याला आम्ही कायम लक्षात ठेऊ, त्याच्याबद्दल आम्ही नेहमीच ऋणी आहोत, नतमस्तक आहोत, अशा शब्दात सुळे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई जिथे जिथे राष्ट्रवादी पक्षाची सत्ता आहे तिथे अतिशय चांगले काम पक्षाने केले आहे. मुंबईमध्ये पण आम्ही चांगला बदल आणि सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित लेख