श्रीमती सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली पवार यांची प्रशंसा

11 Dec 2015 , 07:01:27 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात राष्ट्रीय राजकारणातले सर्वपक्षीय दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पवार साहेबांच्या राजकीय व प्रशासकीय कौशल्याचे तसेच कृषी व शिक्षण क्षेत्रातल्या विकासकामांचे गुणगान गायिले व सोदाहरण दाखले देत जुन्या घटनांना लकाकी दिली.

गेली अनेक वर्षे शरद पवारांची आणि माझी ओळख आहे. त्यांचे काँग्रेस बरोबर असलेले नाते अर्थात अधिक जुने आणि घट्ट आहे. कालौघात काही तात्विक मतभेद आमच्यात उद्भवले असतीलही, तरी आम्हाला एकमेकांबद्दल वाटणारा आदरभाव अबाधित आहे. देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान असलेल्या आदरणीय नेत्यांचा वारसा जतन केला पाहिजे, पुढे चालवला पाहिजे, हा आमचा दोघांचाही दृढविश्वास आहे. म्हणूनच काँग्रेसपासून फारकत घेतल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस हा नेहमीच मित्रपक्ष राहिला आहे, असे सोनिया गांधींनी म्हटले.

शरद पवार यांनी भूषवलेल्या प्रत्येक पदावर आपल्या कर्तृत्त्वाने आपली छाप सोडली आहे. त्यांनी चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. आजही एक प्रभावी प्रशासक आणि उत्तम नेतृत्त्व म्हणून महाराष्ट्राला त्यांची ओळख आहे. संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. दशकभराच्या प्रदीर्घ कालावधीसाठी केंद्रीय कृषिमंत्रिपद भूषवताना त्यांनी कृषीक्षेत्रात भरीव कार्य केले आहे. याच काळात भारताने तांदूळ आणि गहू निर्यातीत नवे विक्रम केले. त्यांनी कृषीक्षेत्रातील संशोधनाला नवी दिशा दिली. त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांबरोबर सौहार्द्रपूर्ण संबंध ठेवले आहेत. त्यांचे संपर्ककौशल्य वाखाणण्यासारखे आहे, याअर्थी ते एक खरे लोकनेते आहेत, असे सांगतनाच श्रीमती गांधी यांनी पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई स्वतः राजकरणापासून दूर असूनही शरद पवारांचा त्याच आधारस्तंभ असल्याचे गांधी यांनी म्हटले.

तर माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी पवार यांच्याबरोबरच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाबाबत अनेक चर्चा आम्ही केल्या आहेत, अशी आठवण मनमोहन सिंग यांनी सांगितली. आधुनिकीकरण आणि आर्थिक विकास, अर्थव्यवस्थेविषयक धोरण यासंदर्भातील त्यांच्या विचारांनी आपल्याला नेहमीच प्रभावित केले आहे. उत्कृष्ट कृषिमंत्री म्हणून त्यांची असलेली कारकीर्द जवळून बघण्याची संधी आपल्याला मिळाली ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट असल्याचे मनमोहन सिंग म्हणाले. शरद पवार म्हणजे खरे पुरोगामी व्यक्तिमत्व असल्याचे सिंग यांनी म्हटले.

संबंधित लेख